परभणी येथील महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून नामनिर्देश पत्र दाखल करण्याच्या मुदतीत महापौरपदासाठी २४ तर उपमहापौर पदासाठी ७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. दरम्यान शिवसेना उबाठा व काँग्रेस या दोन पक्षात महापौर, उपमहापौर निवडीच्या संदर्भात काय वाटाघाटी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येत्या सोमवारी (दि.९) महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेचे येथील बी. रघुनाथ सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजन करण्यात आले आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारी दरम्यान नामनिर्देशनपत्र वितरित करण्यात आले. या मुदतीत २२ उमेदवारांना ५० नामनिर्देशनपत्रांचे वितरण करण्यात आले. तर मंगळवारी (दि.३) सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहा या वेळेत महापौर पदासाठी विविध पक्षांच्या उमेदवाराकडून १४ आणि उपमहापौर पदासाठी विविध पक्षांच्या उमेदवारांकडून ७ नामनिर्देशनपत्र महापालिकेचे नगरसचिव विकास रत्नपारखे यांच्या कार्यालयात दाखल करण्यात आले आहेत.

याच विशेष बैठकीत प्राप्त उपमहापौर व महापौर पदाच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात येणार आहे. छाननीअंती पात्र उमेदवारांची नावे पिठासीन अधिकारी जाहीर करतील. त्यानंतर पिठासीन अधिकारी यांना १५ मिनिटे आगाऊ लेखी सूचना देऊन उमेदवाराना नामनिर्देशनपत्र  मागे घेता येणार आहेत. बैठकीत अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे वर्णानुक्रमे घोषित करण्यात येतील. या विशेष बैठकीत हात उंचावून मतांची नोंद घेतली जाणार आहे.

महापौरपदासाठी शिवसेना उबाठा पक्षाच्या सय्यद समी उर्फ माजुलाला, सय्यद इकबाल सय्यद खाजा, श्याम खोबे, शरफुद्दीन सिद्दिकी, दिलीपसिंह ठाकुर, प्रतिभा सरोदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. केदार खटींग,  मीना वरपूडकर,तिरुमला खिल्लारे, रितेश झांबड जैन यांचे अर्ज दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अर्जुन सामाले तर काँग्रेसच्या वतीने भगवान वाघमारे, गणेश देशमुख, गुलमीर खान यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

उपमहापौरपदासाठी काँग्रेस पक्षाच्या भगवान वाघमारे, गणेश देशमुख, गुलमीर खान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाझिया बेगम, भाजपच्या विश्वजीत बुधवंत तिरूमला खिल्लारे, शिवसेना उबाठाच्या शाम खोबे यांनी अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळानुसार महापौरपद उबाठा पक्षाकडे तर उपमहापौरपद काँग्रेस पक्षाकडे जाणार असे वाटत असतानाच काँग्रेसच्या सदस्यांनी महापौरपदाचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. निवडी पर्यंत कोणकोणत्या वाटाघाटी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.