परभणी : शहरात असलेल्या उड्डाणपुलावर शनिवारी (दि.३) रात्री नऊच्या सुमारास भरधाव वेगाने धावणार्‍या दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात एका दुचाकीवरील तीघे व दुसर्‍या दुचाकीवरील दोघे असे पाच जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना सरकारी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये स्वप्निल सत्यप्रेम लहाने (वय ३१) आणि कृष्णा दिलीप जगताप पुंगळेकर (वय २५) या दोन दुचाकीस्वारांचा समावेश आहे.

शहरातून बाहेर पडताना गंगाखेड नाका परिसरात असलेल्या उड्डाणपुलावर सातत्याने अपघात होतात. गेल्या वर्षभरात अनेक जणांचा या उड्डाणपुलावर मृत्यू झाला आहे. गंगाखेडकडून येणारी वाहने याच पुलावरून येतात तर जिंतूर तसेच सेलू ,पाथरीकडून येणारी वाहनेही याच पुलावरून शहरात येतात. या पुलावर प्रचंड गर्दी असते. शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वार भरधाव वेगाने परस्परविरोधी दिशेने जात होते. स्वप्निल लहाने हा उड्डाणपुलावरून बसस्थानकाकडे येत होता तर कृष्णा जगताप हा गंगाखेड रस्त्यावरील क्रांतीनगरात आपल्या घराकडे जात होता. त्यावेळी या दोन्ही दुचाकी एकमेकांवर आदळल्या. त्यात एका दुचाकीवरील तीघे व दुसर्‍या दुचाकीवरील दोघे रस्त्यावर कोसळले. त्यातील दोघांना मोठा मार लागला. दोन्ही दुचाकींचेही मोठे नुकसान झाले.

अपघातस्थळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. या ठिकाणी बराच काळ वाहतूक खोळंबली. प्रत्यक्षदर्शीपैकी काहींनी धाव घेवून गंभीर जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र यातील दोन गंभीर जखमींचा जागेवरच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अपघातात एकूण पाच जण जखमी झाले. त्यापैकी एकास किरकोळ मार लागल्याची माहिती आहे. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना मदत केली व वाहतूक सुरळीत केली. दरम्यान या उड्डाणपुलावर सातत्याने अपघात घडत असून हा पूल मृत्यूचा सापळा बनला आहे. तिन्ही बाजूंनी ये- जा करणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यासाठी शहर वाहतुकीची यंत्रणा या ठिकाणी कायमस्वरूपी असण्याची आवश्यकता आहे. अवजड वाहतुकीची वाहनेही या पुलावरून मोठ्या प्रमाणात ये- जा करत असतात.