परभणी: सरकारने कर्जमाफीचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. आज महाराष्ट्रातला शेतकरी स्वतःचा कडेलोट करून घेत आहे पण सत्ताधाऱ्यांना त्याकडे पाहायला वेळ नाही. सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याची गरज आहे. साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयाचे कर्ज देताना सरकार हमी घेते पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची हमी सरकार घेत नाही अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी केली.
राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काल बुधवारी (दि.३० एप्रिल) माळसोन्ना येथून पदयात्रेस प्रारंभ झाला. ही पदयात्रा आज गुरुवारी महाराष्ट्र दिनी येथे आल्यानंतर प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या पदयात्रेत शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणा असलेले फलक घेऊन पदयात्रेत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.
परभणी जिल्ह्यातील माळसोन्ना येथे पंधरा दिवसापुर्वी कर्जास कंटाळून सचिन जाधव या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यानंतर त्याच्या सात महिन्याच्या गर्भवती पत्नीनेही आत्महत्या केली. या प्रश्नावर सरकारचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात आली.
बुधवारी दुपारी सचिन जाधव यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आक्रोश पदयात्रेस सुरवात करण्यात आली. त्यानंतर सायाळा येथे या पदयात्रेचा मुक्काम झाला. ही पदयात्रा आज सकाळी परभणी कृषी विद्यापीठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचली. या पदयात्रेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष दामू इंगोले , परभणी जिल्हाध्यक्ष किशोर ढगे , प्रकाश पोपळे , कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित पोवार , शिरोळ पंचायत समितीचे उपसभापती सचिन शिंदे , छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष कृष्णा साबळे , माऊली मुळे , डॅा. बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील , रावसाहेब आलासे, नितेश कोगनोळे , नामदेव भराडे , संभाजी यादव , तानाजी मगदूम यांचेसह पदाधिकारी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात पदयात्रेत सहभागी होते.
राज्यातील सर्व शेतकरी कर्जमुक्त करण्यात यावेत, आत्महत्या झालेल्या भगवानराव टेकाळे सचिन जाधव यांच्या कुटुंबीयांना घरे बांधून देण्यात यावीत, मराठवाडा व विदर्भातील वाढत्या शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी सोयाबीन आणि कापसाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव देण्यात यावा, आत्महत्येनंतर शेतकरी कुटुंबाला दिली जाणारी मदत एक लाख रुपयाऐवजी पाच लाख रुपयापर्यंत देण्यात यावी अशा मागण्या यावेळी आक्रोश शेतकरी आत्महत्येचा या पदयात्रेत करण्यात आल्या.
फोटोओळी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली शेतकरी आक्रोश पदयात्रा महाराष्ट्रदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात आले.