नसरापूरमध्ये एका लहान मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या केल्याची घटना ताजी आहे, या घटनेचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले. नवले पुलावर आंदोलनही करण्यात आलं होतं. या घटनेनंतर आता पुण्यातल्या पर्वती भागात एक संताप आणणारी घटना घडली आहे. आजोबाने नातीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या मुलीने आरडाओरडा केला त्यामुळे शेजारी धावले. त्यांनी या मुलीला सोडवलं आणि या व्यक्तीला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
नेमकी घटना काय घडली?
पुण्यातील पर्वतीच्या पायथा भागात ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणातला आरोपी हा तिचा आजोबा आहे. त्याने या मुलीचे कपडे काढून लैंगिक शोषणाचा प्रयत्न केला. मात्र मुलगी ओरडू लागली आणि तेवढ्यात शेजारील महिला आणि इतर लोक तिच्या मदतीला धावले. ज्यानंतर हा प्रकार उघड झाला. मुलीची या सगळ्यांनी सुटका केली आणि तिच्या आजोबाला पोलीस येईपर्यंत पकडून ठेवलं होतं. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करत स्थानिकांनी पर्वती पोलीस स्थानकाबाहेर गर्दी केली. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी नागरिकांना शांत केलं आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांना दिलं.
पोलिसांनी सांगितला घटनाक्रम
५ मे रोजी रात्री ९.३० च्या सुमारास पर्वती पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पर्वती पायथ्याजवळ एका वयोवृद्ध माणसाने लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाला आहे अशी माहिती मार्शल्सना मिळाली. त्यानंतर तातडीने मार्शल्स त्या ठिकाणी गेले. त्या भागातल्या नागरिकांनी एका वयोवृद्ध नागरिकाला त्या ठिकाणी पकडून ठेवलं होतं. पोलिसांनी त्या वृद्धाला ताब्यात घेतलं. त्यानंतर असं समजलं की हा वृद्ध व्यक्तीने त्याच्या मुलीच्या मुलीवर म्हणजेच नऊ वर्षांच्या नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या वृद्धाने तिला खोलीत बोलवलं आणि तिच्याशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु शेजारी राहणाऱ्या महिलेला त्या मुलीचा रडण्याचा आवाज आला. ज्यानंतर त्या महिलेने शेजाऱ्यांना सांगून तातडीने त्या मुलीला वाचवण्यासाठी धाव घेतली. त्यानंतर त्या मुलीची सुटका केली. त्यामुळे अत्याचाराचा प्रसंग टळला. पोलिसांनी त्या वृद्धाला ताब्यात घेतली. मुलीला ससून रुग्णालयात दाखल केलं. तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अतिप्रसंग किंवा बलात्कार तिच्यावर घडला नाही. पण जे घडलं आहे तो गुन्हा बलात्काराइतकाच गंभीर आहे. त्यामुळे आम्ही गंभीर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईच्या फिर्यादीनंतर पॉक्सो कलम ६, कलम १० तसंच भारतीय न्याय संहिता कलम ७५ आणि ६४, तसंच ६६ यांनुसार गंभीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुलीच्या आईने माध्यमांना काय सांगितलं?
या प्रकरणातील मुलीच्या आईने माध्यमांना हे सांगितलं की नातीचे कपडे आजोबाने काढले होते. तिला नखं मारली होती. आम्ही पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. मी कपड्यांच्या दुकानात काम करते.रात्री ९ च्या सुमारास मी परत आले. आमच्या शेजारच्या खोलीत ही घटना घडली. आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे अशी आमची मागणी आहे असं मुलीच्या आईने म्हटलं आहे.
मुलीच्या वडिलांनी काय म्हटलं आहे?
पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं आहे, आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही काळजी करु नका. पोलीस आम्हाला साथ देत आहेत. जे कृत्य आरोपीने केलं आहे तो माझा सासरा असला तरीही माझी ही मागणी आहे की त्याला फाशी झाली पाहिजे. मी रिक्षा चालक आहे. मी रिक्षा चालवण्यासाठी बाहेर होतो. वर्षभरापूर्वी माझ्या बापाने माझा मोबाइल चोरला होता. त्यानंतर मी त्याला हाकलून दिलं होतं. आता तो इथे कसा आला हे आम्हाला माहीत नाही. मात्र त्या माणसाला फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे असं मुलीच्या वडिलांनी म्हटलं आहे.
स्थानिक नागरिकांनी काय काय म्हटलं आहे?
१) कुणाला काही सांगितलंस तर मारुन टाकेन अशी धमकी त्या मुलीला तिच्या आजोबाने दिली होती. माझी नात आहे ती असं सांगत होता.
२) मुलीची अवस्था आम्ही पाहिली. ती मुलगी ओरडत होती, आजोबांनी मला माळ्यावर बोलवून घेतलं होतं असं त्या मुलीने सांगितले.
३) आजोबाने नातीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही त्या मुलीला बाहेर काढलं. त्या माणसाला आम्ही कोंडून ठेवलं होतं.
पुण्याच्या महापौर काय म्हणाल्या?
पर्वती परिसरात जी घटना घडली ती एका घरात घडली आहे. विकृत मनोवृत्तीचा तो आरोपी आहे. मी आज पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे आणि महिला सुरक्षेची मागणी आम्ही केली आहे. महापौर मंजुषा नागपुरे म्हणाल्या की अशा घटना घडू नयेत म्हणून समुपदेशन केलं पाहिजे. विविध संघटना कार्यरत आहेत. सगळ्यांनी एकत्र येऊन यामध्ये उतरलं पाहिजे. शिवाय पर्वती प्रकरणाचा तपास निष्पक्षपणे सुरु आहे. आरोपीला शिक्षा होईल असंही आश्वासन त्यांनी दिलं.
