Lohgad Murder Case : पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरण हे राज्यासह देशभरात गाजलं. कारण केतन अग्रवालची होणारी पत्नी सिया गोयलने केतनला पुण्याजवळ असलेल्या लोहगडावर घेऊन जात दरीत ढकलून देत त्याची हत्या केली. ही घटना जून महिन्यात घडली होती. या प्रकरणी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी या दोघांना अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांनी या प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र ५ हजारांहून अधिक पानांचं आहे. तसंच या प्रकरणात एक ट्विस्ट समोर आला आहे. सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी या दोघांचं लग्न झालं होतं का? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.

एका फोटोमुळे निर्माण झाला नवा ट्विस्ट

पोलिसांच्या माहितीनुसार, डिसेंबर २०२५ मध्ये सिया गोयल आणि चेतन चौधरी काही मित्रांसह राजस्थानला गेले होते. यावेळी त्यांनी खाटूश्याम मंदिरात गुपचूप लग्न केल्याचा पोलिसांना संशय आहे. तपासादरम्यान पोलिसांना दोघांचा एक फोटो मिळाला. या फोटोमध्ये सियाच्या भांगेत सिंदूर दिसतो आहे. तर चेतनच्या गळ्यात फुलांचा हार आहे. यामुळे या दोघांनी आधीच लग्न केलं होतं का? याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आरोप पत्रासह हा फोटोही न्यायालयात सादर करण्यात आला आहे. पोलिसांनी याआधी दिलेल्या माहितीनुसार सिया आणि चेतन यांच्यात ऑक्टोबर २०२५ पासून जवळीक वाढली होती. त्यांच्या नात्याला दोन्ही कुटुंबांचा विरोध असल्याची माहितीही तपासात समोर आली. राजस्थानला जाण्यासाठी दोघांनी सुरुवातीला विमानाचे नियोजन केले होते. मात्र विमानसेवा रद्द झाल्यानंतर त्यांनी रेल्वेने राजस्थान गाठले. खाटूश्याम मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. याच ठिकाणी लग्न झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र लग्नाच्या वेळेचे कोणतेही सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेले नाही. या प्रकरणात आता पोलीस पुढील तपास करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

१८ जूनला केतन अग्रवाल या तरुणाला लोहगडावरुन धक्का देऊन सिया गोयलने ठार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात सियाला तिचा प्रियकर चेतन चौधरीने साथ दिल्याचंही समोर आलं. या दोघांवर हत्येचा आरोप असल्याने दोघांना अटक करण्यात आली आहे. सिया आणि केतन यांचं लग्न डिसेंबर महिन्यात होणार होतं. पण सियाला केतन नाही तर चेतन आवडत होता. त्यामुळे तिने केतनची लोहगडावरुन धक्का देऊन हत्या केली आणि तो अपघात आहे असं भासवलं.

सिया गोयलवर केतनच्या कुटुंबाला संशय कसा आला?

केतनच्या मृत्यूनंतर जेव्हा सिया गोयल केतनच्या कुटुंबाला भेटायला गेली तेव्हा त्यांनी काही प्रश्न तिला विचारले. त्याची उत्तरं तिला व्यवस्थित देता आली नाहीत. कुटुंबीयांचं हे म्हणणं होतं की लोहगडावर जर तू आणि तोच गेला होतास तर तुला उत्तरं का देता येत नाहीत? सुरुवातीला केतन सेल्फी घेताना पडला आणि दरीत कोसळला असं तिने सांगितलं. नंतर सियाने सांगितलं केतनकडे मी पाण्याची बाटली देत होते तेव्हा त्याचा पाय घसरला. तसंच केतन जिथून पडला ते ठिकाण सहजपणे दिसत नाही त्यामुळे कुटुंबीयांना सिया गोयलवर संशय आला आणि पुढे सगळा प्रकार उघड झाला.