हर्षद कशाळकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात करोनामुळे ४ हजार ५७४ जणांचा मृत्यू झाला आहे. या सर्व मृतांच्या वारसांना शासनाकडून ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही मदत दिली जाणार आहे. यासाठी जवळपास २२ कोटी ८७ लाख रुपयांचा निधी लागणार आहे.

रायगड जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत करोना १ लाख ७१ हजार ९८७ जणांना करोनाची लागण झाली होती. यापैकी १ लाख ६७ हजार १७८ जण उपचारानंतर बरे झाले. ४ हजार ५७४ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

करोनामुळे दगावलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. याबाबतचे शासन आदेश नुकतेच निघाले आहेत.

त्यामुळे करोनामुळे दगावलेल्या ४ हजार ५७४ रुग्णांच्या वारसांना शासन आदेशाप्रमाणे प्रत्येकी ५० हजारांची रक्कम मिळू शकणार आहे.

राज्य आपत्ती निवारण निधीतून ही रक्कम थेट मृतांच्या वारसांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारकडून एक पोर्टल विकसित करण्यात आले आहे. यावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याशिवाय ग्रामपंचायत कार्यालय आणि सेतू कार्यालयाच्या माध्यमातून मृतांच्या वारसांना अर्ज करता येणार आहे. यासाठी जिल्ह्याला २२ कोटी ८७ लाख येवढय़ा निधीची आवश्यकता भासणार आहेत.

अर्जाची पडताळणी

जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त होणारे अर्ज हे पडताळणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविले जातील, अर्जाची वैधता तपासण्याचे काम जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखालील समिती करेल. त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे प्राप्त होईल. यानंतर मृतांच्या वारसाच्या खात्यात ही मदत जमा केली जाणार आहे.     

जिल्ह्यातील करोनाची सद्य:स्थिती..

जिल्ह्यात सध्या उपचाराधीन २३५ रुग्ण आहेत. राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या पहिल्या दहा जिल्ह्यांत रायगडचा समावेश आहे. जिल्ह्यात सध्या पनवेल मनपा हद्दीतील १२५, पनवेल ग्रामीण हद्दीतील ३०, उरणमधील ५, खालापूरमधील ६, कर्जत १०, पेण २२, अलिबाग १७, माणगाव ५, रोहा ५, श्रीवर्धन १, महाड ७ आणि पोलादपूरमधील २ रुग्ण आहेत. त्यामुळे सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांनी दिले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In raigad district over four thousand people died due to corona zws
First published on: 30-11-2021 at 01:52 IST