अलिबाग: रायगड जिल्ह्यात १ लाख १ हजार ५१० हेक्टरवर यंदा खरीपाची लागवड करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात, नागली आणि तूर पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची उत्पादकला वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने तयारी पुर्ण केली आहे. रायगड जिल्ह्यात ९८ हजार ४८७ हेक्टरवर भाताची लागवड केली जाणार आहे. तर ३ हजार ०२३ हेक्टरवर नागली लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षी ९० हजार हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यावर्षी त्यात वाढ करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

यंदाच्या खरीप हंगामासाठी सुमारे २५ हजार क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात जवळपास २२ हजार क्विंटल सुधारीत तर २५० क्विंटल संकरीत भात बियाण्याचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी यावर्षी साधारणपणे २० हजार ०२० मेट्रीक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक स्थापन करण्यात आली आहेत.

हेही वाचा : राज्यात आठ दिवस पावसाचा मुक्काम; मोसमी वाऱ्यांबाबतही गुड न्यूज

खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी देखील कामाला लागला आहे. पावसाळ्यापूर्वीची मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरु केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरु झाली आहेत. याशिवाय बांधबंदिस्ती , चर मारणे यासारखी कामे देखील सुरु झाली आहेत.

शेती क्षेत्र घटतयं….

जिल्ह्यात वाढते औद्योगिकरण, शहरीकरण, शेतमजूरांची कमतरता यावेळी दरवर्षी भातलागवडीखालील शेती क्षेत्रात घट होत आहे. भात लागवडीचे क्षेत्र १ लाख २४ हजार हेक्टरवरून १ लाख १ हजार हेक्टवर येऊन ठेपले आहे. शेती क्षेत्रातील घट चिंताजनक आहे. शेतकरी शेतीपासून दूरावत चालल्याचे यातून दिसून येत आहे.

हेही वाचा : “महात्मा गांधींना अभिमान वाटत असेल की त्यांचा पणतू…”; तुषार गांधींच्या ‘त्या’ टीकेला वंचित बहुजन आघाडीचं प्रत्युत्तर!

उत्पादकता वाढविण्यावर भर…

शेतीक्षेत्रात होणारी घट लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी सुधारीत आणि संकरीत बियाणे घेण्यासाठी तसेच अधुनिक पिक लागवड पध्दतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहीत केले जात आहे. गेल्यावर्षी भाताची उत्पादकता हेक्टरी ४० क्विंटल होती. यावर्षी त्यात वाढ करण्याचे उदिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे.