रत्नागिरी – “देव दूर कुठेही नाही; जिथे प्रेम आहे, तिथे तो प्रकट होतो. भक्ती आणि सत्संगामुळे व्यक्तिमत्त्वातील कठोरता मऊ होते आणि जीवन अधिक रसमय व सुंदर बनते”, असे गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांनी सांगितले.

रत्नागिरी शहरात ‘भक्ती आणि सत्संग’ या कार्यक्रमांचे आर्ट ऑफ लिव्हींग मार्फत आयोजन करण्यात आले होते. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यादाच श्री श्री रवि शंकर यांच्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरीकरांनी एक ऐतिहासिक आणि अविस्मरणीय क्षण अनुभवला. जागतिक आध्यात्मिक गुरू आणि मानवतावादी नेते गुरुदेव श्री श्री रवि शंकर यांच्या पहिल्याच भेटीने गोगटे कॉलेज क्रीडांगण भक्ती, आनंद आणि चैतन्याने उजळून गेले. यावेळी हजारो भक्तांनी गुरुदेवांचे उत्स्फूर्त स्वागत केले.

भक्तांना संबोधित करताना गुरुदेवांनी भक्ती आणि प्रेमाचे सखोल महत्त्व उलगडून सांगितले. “देव दूर कुठेही नाही; जिथे प्रेम आहे तिथे तो प्रकट होतो,” असे सांगत त्यांनी भक्ती ही प्रेमात पूर्णपणे विलीन होण्याची अवस्था असल्याचे स्पष्ट केले. भक्ती आणि सत्संगामुळे व्यक्तिमत्त्वातील कठोरता मऊ होते आणि जीवन अधिक रसमय व सुंदर बनते, असे ही त्यांनी सांगितले.

राग, द्वेष आणि नकारात्मक भावनांमुळे मनावर होणाऱ्या परिणामांबाबत गुरुदेवांनी उपस्थितांना सावध केले. क्षमाशीलतेचा अभाव आपल्यालाच आतून कमकुवत करतो, असे त्यांनी यावेळी नमूद केले. भक्तीच्या उपचारशक्तीवर भर देत त्यांनी सांगितले की, भक्तीमुळे भीती, चिंता, एकाकीपणा दूर होऊन धैर्य, शांती आणि आंतरिक बळ निर्माण होते, असे ही सांगितले.

या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार विनय कोरे यांची उपस्थिती लाभली. गुरुदेवांचा रत्नागिरी दौरा हा महाराष्ट्रातील सहा दिवसांच्या व्यापक दौऱ्याचा भाग असून, या काळात त्यांनी विविध सामाजिक घटकांशी संवाद साधला.

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करताना गुरुदेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्ती आणि शौर्याची आठवण करून दिली. वाढत्या तणाव आणि मानसिक अस्वस्थतेच्या काळात गुरुदेवांचा हा संदेश अनेकांसाठी आशा, शांती आणि नवचैतन्य देणारा ठरला. कार्यक्रमानंतर भक्त चेहऱ्यावर हास्य आणि हृदयात शांती घेऊन परतले. या कार्यक्रमासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती.