रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील मोठ्या संख्येने पेन्शनधारक रस्त्यावर उतरले असून शहरातील मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली. घोषणाबाजी करत निघालेला मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी संजय नागवेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदन सादर केले.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कर्मचारी पेन्शन योजना (ईपीएस-१९९५) मधील प्रलंबित मागण्यांसाठी देशभरात मोर्चे व निदर्शने आयोजित करण्यात आले. किमान पेन्शन वाढ, महागाई भत्ता आणि वैद्यकीय सुविधा यांसंदर्भात केंद्र सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. या आंदोलनात ज्येष्ठ नागरिक, महिला पेन्शनधारक तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
रत्नागिरी जिल्ह्यात ईपीएस-१९९५ योजनेअंतर्गत सुमारे ३३ हजार पेन्शनधारक असून अत्यल्प पेन्शनमुळे त्यांचे जीवनमान खालावल्याची भावना व्यक्त करण्यात आली. अनेकांना दरमहा एक हजार रुपये किंवा त्याहून कमी पेन्शन मिळत असल्याने वाढत्या महागाईत औषधोपचार, घरभाडे, वीजबिल व अन्नधान्याचा खर्च भागवणे कठीण होत असल्याचे निवेदनात नमूद आहे.
किमान पेन्शन दरमहा दहा हजार रुपये करावी, महागाई भत्ता लागू करावा, निधनानंतर पत्नीला शंभर टक्के पेन्शन द्यावी तसेच पेन्शनधारक व त्यांच्या पत्नींना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. ३० ते ३५ वर्षे सेवा करूनही वृद्धापकाळात सन्मानाने जगता येत नसल्याची खंत आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. केंद्र सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

