सांगली : विश्‍वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधना उद्या रविवार दि. २३ नोव्हेंबर रोजी विवाह बंधनात अडकणार असून नियोजित वर पलाश मुच्छल यांच्यासह वर्‍हाडी मंडळी दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री विश्‍वविजेती भारतीय महिला संघाच्या उपस्थितीमध्ये स्मृतीचा मेंदीचा कार्यक्रम रंगला, तर आज हळदीचा विधी पार पडला. या विवाह सोहळ्यांसाठी केवळ आमंत्रितांनाचा प्रवेश असून विवाहस्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आपल्या हुकमी फलंदाजीच्या खेळावर भारतीय महिला क्रिकेट संघात स्मृतीने अढळ स्थान प्राप्त केले आहे. क्रिकेटमध्ये अव्वल स्थान पटकावणार्‍या स्मृतीचा विवाह मध्य प्रदेशमधील इंदूर येथील सिने संगीतकार व निर्माता पलाश मुच्छल यांच्याशी होत असून यासाठी रविवारचा मुहुर्त निश्‍चित करण्यात आला आहे. सांगली इस्लामपूर रस्त्यावरील समडोळी गावच्या हद्दीत असलेल्या फार्म हाउसमध्ये हा सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी पाच एकर क्षेत्रातील शेतघर नयनरम्य विद्युत रोषणाईने सजविण्यात आले असून प्रवेशदारावर हाताचे स्कॅनिंग करूनच आतमध्ये निमंत्रितांना प्रवेश देण्यात येत आहे.

स्मृतीच्या विवाहाचे निमंत्रण मोजक्या लोकांनाच देण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तर बीसीसीआयचे अध्यक्ष जय शहा, राहूल द्रविड, व्ही.एस. लक्ष्मण, सिनेअभिनेता जॉकी श्रॉफ, सोनू निगम, विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तथापि, या लग्नसोहळ्यासाठी जिल्ह्यातील आमदार, खासदारांसह पालकमंत्र्यांनाही निमंत्रण नसल्याची माहिती मिळाली.

स्मृतीच्या लग्न सोहळ्यासाठी अतिमहनीय व्यक्तींची उपस्थिती राहणार असल्याने लग्नस्थळापासून तीन किलोमीटर अंतरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येत आहे. उप अधिक्षक संदीप भागवत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक भैरू कोळेकर, पोलीस निरीक्षक अरूण सुगावकर यांच्यासह १०० हून अधिक पोलीसांचा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन आज सुरू होते. या मार्गावर वाहतुक कोेंडी होउ नये यासाठी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक पोलीसही तैनात करण्यात येत आहेत. या विवाह सोहळ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघातील स्मृतीचे सहकारी खेळाडू शुक्रवारीच सांगलीत दाखल झाल्याची माहिती मिळाली. मानधना परिवाराकडूनही स्मृतीच्या विवाहाबद्दल गोपनीयता पाळण्यात येत आहे.

विश्‍वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघात स्मृतीने शेफाली शर्मासोबत शतकी धावसंख्या उभी केली. अंतिम सामन्यात ५८ चेंडूमध्ये ४५ धावा सलामीला केल्या होत्या. या तिच्या योगदानामुळे दक्षिण आफ्रिका संघाबरोबरच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने २९७ धावापर्यंत मजल गाठली. यामुळेच भारतीय महिला संघाचे नाव विश्‍वचषकावर कोरले गेले.