सांगली : साहित्य क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाबद्दल कवयित्री व साहित्याच्या अभ्यासिका डॉ. अरूणा ढेरे यांना लोकनेते राजारामबापू पाटील राष्ट्रीय ललित कला जीवन गौरव सन्मान जाहीर करण्यात आला आहे. ५० हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अकादमीचे निमंत्रक आणि राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य कवी प्रा. प्रदीप पाटील यांनी या पुरस्काराची घोषणा केली. राजारामबापू पाटील ललित कला अकादमीच्यावतीने हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. तसेच शैली शास्त्रीय समीक्षेतील गुणवत्तापूर्ण योगदाना करिता प्रसिध्द समीक्षक डॉ.दिलीप धोंडगे (सटाणा),साहित्यातील गुणवत्तापूर्ण अनुवादा करिता प्रसिध्द अनुवादक व कवी डॉ.सचिन केतकर (बडोदा) आणि प्रायोगिक रंगभूमी वरील योगदानाकरिता प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे(पुणे) यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी रु.२५ हजार, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या सन्मानांचे स्वरुप आहे.

हेही वाचा : बारामतीत आता काका-पुतण्या थेट लढत होणार? विधानसभेच्या उमेदवारीवरून युगेंद्र पवारांचं सुचक वक्तव्य!

या वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या ‘लोकनेते राजारामबापू पाटील ललित कला विशेष सन्माना’करिता संयुक्त महाराष्ट्र चळवळीवरील ग्रंथांचे लेखक प्राचार्य डॉ.देवीदास वायदंडे (सोमेश्वरनगर) यांची निवड केली आहे.रु.१० हजार व सन्मानचिन्ह असे त्याचे स्वरुप आहे. अकादमीचे सदस्य डॉ.संजय करंदीकर (बडोदा) यांचाही समीक्षा व संशोधन क्षेत्रातील कार्याबद्दल गौरवपर सत्कार करण्यात येणार आहे.

हेही वाचा : पदवीधर मतदान नोंदणीवर ठाकरे गटाचा मोठा आरोप, अनिल परब म्हणाले, “आमच्या पक्षाने नोंदवलेली नावे…”

पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन दि. ३० जून रोजी करण्यात येणार आहे. यावेळी राजमाता शुभांगी राजे गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.