सांगली : पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेत वारंवार मूर्ती तयार करण्यासाठीचा वेळ, खर्च वाचचिण्यासाठी २१ फुटी फायबरची गणेशमूर्ती मिरजेतील श्रीमंत महागणपती मंडळाने यंदा साकारली आहे. ही मूर्ती २५ वर्षे टिकणार असून यानंतरही या मूर्तीत वापरण्यात आलेल्या साहित्याचा पुनर्वापर करण्याची योजना करण्यात आली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अजिंक्य आमटे यांनी सांगितले.

मंडळाचे यंदाचे १७ वे वर्ष असून सर्वात उंच श्रींची मूर्ती बसविण्याची परंपरा मंडळाची आहे. या वर्षी २१ फुटी रेझीन फायबर यापासून श्रींची मूर्ती बनविण्यात आली असून तिचे आयुष्य किमान २५ वर्षे आहे. मूर्ती विसर्जन करून प्रदूषण वाढू नये यासाठी तिची जपणूक करून प्रतिवर्षी नव्याने रंगरंगोटी करून पुन्हा वापरण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. केवळ ढोल-ताशा या पारंपरिक वाद्यांचा वापर करून मिरवणूक काढून ही मूर्ती जतन केली जाणार आहे.

हेही वाचा :सांगली जिल्ह्यातील ७९ गावांत ‘एक गाव एक गणपती’ उपक्रम, यावर्षी नव्या २२ गावांची भर

तसेच मंडळाच्या वतीने गणेशोत्सवामध्ये सामाजिक उपक्रम राबविण्यात आले असल्याचे मंडळाच्या उपाध्यक्षा ऐश्वर्या धुमाळ यांनी सांगितले. सद्य:स्थितीमध्ये महिलांना स्वसुरक्षा महत्त्वाची असल्याने या निमित्ताने महिलांनी स्वसंरक्षण कसे करावे, लहान मुलींना चांगला स्पर्श, वाईट स्पर्श याची माहिती देण्याबरोबरच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अवयवदानाबाबत जागृतीची मोहीम हाती घेण्यात आली असून मंडळाच्या २५ कार्यकर्त्यांनी अवयवदान करण्यास मान्यता दिली आहे. यावेळी मंडळाचे सदस्य अभिजित धुमाळ, सागर चौगुले, सुनील दिवाण, संकेत परचुरे, विनय जोशी आदी उपस्थित होते.