वाई: मोठमोठे घोटाळे होत असताना आणि त्यात नेते अडकलेले असताना त्याच वेळी त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे आज त्यांच्या पक्षाची ही अवस्था झाल्याची टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली. उदयनराजे म्हणाले, चूक करताना कार्यकर्त्यांना पाठीशी घालणे आणि पक्ष सोडल्यावर त्यांच्याविरोधात भूमिका घेण्याच्या प्रकारामुळे त्यांच्या पक्षात दिवसेंदिवस घट होत आहे. गुढीपाडव्यानिमित्त खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, की सध्या त्यांच्या पक्षात नेतेच नाही, तर कार्यकर्त्यांचीही वानवा आहे. या अवस्थेत पक्षाची वाढ व्हावी म्हणून ते प्रयत्न करत आहेत. त्यातून किती वाढ होतेय माहिती नाही. पण घट मात्र होत चालली आहे. कधी काळी जिल्ह्यात प्रभावी असलेल्या या पक्षाची आज अशी अवस्था का झाली? नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सोडून का गेले, जात आहेत याचा विचार ते कधी करणार आहेत की नाही, असा प्रश्नही त्यांनी या वेळी विचारला.
हेही वाचा : राज ठाकरेंची मोठी घोषणा! “फक्त नरेंद्र मोदींसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीला बिनशर्त पाठिंबा!”
उदयनराजे म्हणाले, की सततच्या बदलाला लोक कंटाळले आहेत. काल तुमच्यासोबत असलेले आज एकदम असे वाईट कसे काय झाले, याची उत्तरे हे नेते कधी देणार आहेत की नाही? लोकांना गृहीत धरणे सोडून द्या. ते नेते, पक्ष म्हणून विचार करताना काल, आज आणि उद्या सर्व काळावेळाचा विचार करतात. पूर्वी याला निवडून द्या, आता तो नको याला द्या, असे मतदारांना मूर्ख बनवणे सोडून द्या, अशा शब्दांत उदयनराजे यांनी टीकास्त्र सोडले.
