वाई : ‘कोयना खोऱ्यात झालेल्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांविषयी व अनधिकृत बांधकामांविषयी मुख्यमंत्र्यांनी आपले मत व्यक्त करावे आणि माहिती द्यावी,’ अशी मागणी साताऱ्यातील ‘सह्याद्री वाचवा’ मोहिमेतील कार्यकर्त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस सातारा जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. त्यांचे बुधवारी सायंकाळी दरे तर्फ तांब (ता. महाबळेश्वर) येथे हेलिकॉप्टरने आगमन झाले. त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी ही मागणी केली. सातारा जिल्ह्यातील कांदाटी खोऱ्यातील सह्याद्री व्याघ्रप्रकल्पालगत असलेल्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील अशा झाडाणी (ता. महाबळेश्वर) गावात अनेक एकर जागेची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अल्प दरात खरेदी केली असल्याचे उघड झाले होते. या संदर्भात ‘लोकसत्ता’ने गेल्या शनिवारी (२५ मे) वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर खळबळ उडाली होती. आता मुख्यमंत्री त्यांच्या सातारा जिल्ह्यातील गावी आले असल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकरणाबाबत त्यांच्याकडून भूमिका मांडली जावी, अशी अपेक्षा पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते बाळगून आहेत.

हेही वाचा : जतमधील माजी नगरसेवक खून प्रकरणातील मुख्य संशयित उमेश सावंत १४ महिन्यानंतर न्यायालयात हजर

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, ‘जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन माहिती घेऊ,’ असे सांगितले होते. ते सोमवारी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. मात्र, ‘या प्रकरणाबाबत लवकरच सर्व ती माहिती घेतली जाईल,’ असे त्यांनी पुन्हा सांगितले. ‘लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आणि आचारसंहिता संपल्यानंतर मी याविषयी मत व्यक्त करणार आहे,’ असे ते म्हणाले. दरम्यान, ‘सध्या सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत माहिती जमा करण्याची लगबग सुरू असल्याचे समजते. वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव यांनी महाबळेश्वर तहसीलदारांचा एक हजार पानी चौकशी अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. ‘त्यावर मुख्यमंत्री जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेतील व आपले मत व्यक्त करतील,’ असे सूत्रांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.