वाई: दोन लाखांची खंडणी मागितल्याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्याच्या कारणावरून आज शुक्रवारी दुपारी सदर बझारमधील लक्ष्मी प्रकाश डागा, प्रकाश डागा यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पोवई नाका येथील घरासमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले आहे. रविवार पेठेतील जुनी भाजी मंडईत राहणारा साहिल कोलकर, सलीम कोलकर, क्षमाप्पा कोलकर हे प्रकाश डागा व इतर कुटुंबीयांकडे दोन लाखांची खंडणी मागत होते.त्यास नकार दिल्यानंतर गुटखा विक्री करा, तुम्हाला जास्तीचे पैसे देतो, असे म्हणत त्या तिघांकडून प्रकाश डागा यांच्यावर दबाव टाकण्यात येत होता. त्यास नकार दिल्याने कोलकरांकडून खंडणीच्या कारणास्तव डागा व इतरांना मारहाणही झाली होती. मारहाण करतानाच कराड, सांगली येथील गुंड आणून संपूर्ण कुटुंबाला जिवंत मारण्याची धमकीही देण्यात आली. हेही वाचा. Maharashtra Breaking News Live : “यांची थोबाडं उघडी पडली पाहिजे म्हणून मी काही गोष्टी…”; पत्रकार परिषदेत फडणवीस आक्रमक, म्हणाले… याबाबतचा तक्रार अर्ज लक्ष्मी डागा यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे केला होता. अर्ज करूनही पोलिसांनी दखल न घेतल्याने त्यांनी पालकमंत्र्यांच्या घरासमोर शुक्रवारी आत्मदहनाचा इशारा दिला होता. यानुसार त्या ठिकाणी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. हेही वाचा. घराणेशाहीत भाजपही मागे नाही, केंद्रीय राज्यमंत्र्याच्या मुलाला व बहिणीला पक्षात स्थान दुपारी बाराच्या सुमारास लक्ष्मी व प्रकाश डागा यांनी त्या ठिकाणी येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. हे लक्षात येताच पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. याची नोंद घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलिस ठाण्यात सुरू होते.