सावंतवाडी : पर्यावरणाचे बिघडणारे संतुलन आणि वाढती वृक्षतोड यावर मात करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीने एक अत्यंत कौतुकास्पद आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. गावातून मृत्यू दाखला किंवा विवाह नोंदणी दाखला हवा असल्यास आता ग्रामस्थांना अनिवार्यपणे एक झाड लावावे लागणार आहे.
शासनाच्या ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या मोहिमेला बळ देण्यासाठी सरपंच सौ. मिलन पार्सेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. मृत्यू दाखल्यासाठी: मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ वारसांनी एक झाड लावून त्याचा फोटो ग्रामपंचायतीत जमा करणे आवश्यक आहे.
विवाह नोंदणीसाठी: नवविवाहित दांपत्याने एकत्रितपणे वृक्षारोपण करून तो आनंदाचा क्षण आणि झाड लावल्याचा फोटो अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. ग्रामपंचायतीकडून अधिकृत दाखला प्रदान केला जाणार आहे.,असे सरपंच सौ मिनल पार्सेकर यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ”वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. आपल्या गावातील हरित क्षेत्र वाढावे आणि येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा मिळावी, या उद्देशाने आम्ही हा नियम लागू केला आहे. ग्रामस्थांनी याला सकारात्मक प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.”
ग्रामपंचायतीच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. केवळ कागदोपत्री प्रक्रिया न राहता, यातून सामाजिक बांधिलकी आणि निसर्ग संवर्धनाचे मूल्य जपले जात आहे. या उपक्रमासाठी उपसरपंच हेमंत रमाकांत मराठे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी विशेष परिश्रम घेत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी मळेवाड-कोंडुरे ग्रामपंचायतीने उचललेले हे पाऊल इतर ग्रामपंचायतींसाठीही दीपस्तंभ ठरणारे आहे.
