सावंतवाडी : सावंतवाडी येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग जिल्हा उप कारागृहाची संरक्षक भिंत कोसळल्याने संस्थानकालीन ऐतिहासिक ठेव्याला मोठा धक्का बसला आहे. दगडी भिंतीवर सिमेंटचे बांधकाम केल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचा (PWD) कारभार चव्हाट्यावर आला आहे. घटनेनंतर कारागृह अधीक्षकांनी माध्यमांना कव्हरेज करण्यापासून रोखल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा उप कारागृहाची बरीच जुनी असलेली संरक्षक भिंत आज दुपारी अचानक कोसळली. ही भिंत संस्थानकाळात दगड आणि चुन्याचा वापर करून बांधण्यात आली होती, जी त्या काळातील स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने या ऐतिहासिक भिंतीवर सिमेंटचे थर चढवून चुकीचे बांधकाम केले होते, ज्यामुळे भिंतीची मूळ रचना कमकुवत झाली आणि ती कोसळली. या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारागृहाच्या चहूबाजूच्या तटबंदीलाही धोका निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच माध्यमांचे प्रतिनिधी घटनास्थळी पोहोचले. मात्र, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी माध्यमांना कव्हरेज करण्यापासून रोखले. यामुळे घटनेमागील नेमके कारण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीच्या कामावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या संदर्भात, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे यांनी सांगितले की, कोसळलेल्या भिंतीमुळे कैद्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने उपाययोजना म्हणून कैद्यांना सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील कारागृहात हलवण्यात येणार आहे.
या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच, भविष्यात अशा ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्यासाठी योग्य नियोजन आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच दुरुस्तीची कामे करावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भोंगळ कारभारावर आता पुन्हा एकदा टीका होऊ लागली आहे.