सावंतवाडी: “साहित्यिक आणि सत्ताधारी व्यवस्था यांचे सख्य कधीच नसते. लेखक आणि कवीला समाजातील सत्य मांडून प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उभे राहायचे असते. मात्र, आजच्या काळात साहित्यिक आणि सत्ताधारी व्यवस्था मांडीला मांडी लावून बसत असल्याचे चित्र आहे. यामुळे समाज आता साहित्यिक आणि सत्ताधारी अशा दोघांकडूनही अपेक्षा बाळगू शकत नाही,” असे परखड प्रतिपादन कवी अजय कांडर यांनी केले.
सिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थेच्या वतीने कणकवली येथील नगर वाचनालयाच्या सभागृहात आयोजित दुसऱ्या सम्यक संबोधी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
आपल्या भाषणात कांडर यांनी सत्ताधारी व्यवस्थेच्या वाढत्या हस्तक्षेपावर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, “साहित्य आणि संस्कृती संस्थांची स्वायत्तता टिकवून ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, सध्या सत्ताधारी व्यवस्थाच या संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा लेखक प्रस्थापित व्यवस्थेचा भाग बनतो, तेव्हा तो केवळ मनोरंजनासाठी किंवा स्वतःच्या श्रेष्ठत्वासाठी लिहितो. त्याचा समाजाशी असलेला संबंध तुटतो.”
या संमेलनाचे उद्घाटन मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते विनय साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध साहित्यिकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांनी सम्यक संबोधी काव्य पुरस्कार: डॉ. योगिता राजकर,बाबुराव बागुल पुरस्कार: कथाकार महावीर कांबळे व गोलपिठा पुरस्कार: कवयित्री विद्या पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
मराठी साहित्यातील प्रवाहांवर भाष्य करताना कांडर म्हणाले की, कलावादी भूमिका घेणाऱ्यांनी कधीही समाजाच्या हिताचा विचार केला नाही. मात्र, मराठीतील दलित साहित्याने ही कोंडी फोडली आणि म्हणूनच या साहित्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात कवी विठ्ठल कदम यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले. यामध्ये मोहन कुंभार, श्वेतल परब, ऋतुजा सावंत भोसले, पी. एल. कदम, निशिगंधा गावकर यांच्यासह अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. या कार्यक्रमाला मधुकर मातोंडकर, संस्थेचे अध्यक्ष किशोर कदम, कार्यवाह सूर्यकांत साळुंके, लेखक संजय तांबे, नेहा कदम, संदीप कदम, सत्यवान साटम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदेश तांबे यांनी केले तर आभार संदीप कदम यांनी मानले.
