सोलापूर : शेतात रात्री अंधारात येऊन बसलेल्या गावातील मुलांची चौकशी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यास त्या अल्पवयीन मुलांनी शिवीगाळ आणि मारहाण करीत असताना चुलत आजोबांसोबत गेलेल्या १३ वर्षांच्या मुलाला डोक्यात दगड लागला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन त्या मुलाचा मृत्यू झाला. बार्शी तालुक्यातील सर्जापूर गावच्या शिवारात रात्री हा प्रकार घडला. इम्रान अमर पाटील असे या घटनेत हकनाक बळी गेलेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. याप्रकरणी संबंधित तिन्ही हल्लेखोर अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मृत इम्रान याचे वडील अमर अन्सर पाटील (वय ३८) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाटील कुटुंबीय सर्जापूर शिवारात आपल्या शेतातील वस्तीवर राहतात. रात्री अंधारात त्यांच्या शेतामध्ये कोणीतरी अज्ञात व्यक्ती येऊन बसल्याची चाहूल लागल्यामुळे अमर पाटील हे पुढे आले आणि त्यांनी विजेरी घेऊन प्रकाशझोत टाकला.
विजेरीचा प्रकाशझोत त्या मुलांच्या तोंडावर पडला. तेवढ्याशा कारणावरून १६ वर्षे वयाच्या तिन्ही अल्पवयीन मुलांनी अमर पाटील यांना शिवीगाळ करून दगड व काठीने हल्ला करण्यास सुरुवात केली. त्यांचा आरडाओरडा ऐकून अमर पाटील यांचे चुलते शाहीद इस्माईल पाटील व मुलगा इम्रान हे दोघे धावत गेले. त्यावेळी हल्लेखोर मुलांनी भिरकावलेला दगड इम्रान याच्या डोक्याला लागला. त्यामुळे गंभीर जखमी होऊन तो जागेवर बेशुद्ध पडला. रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झाला. वैराग पोलिसांनी संबंधित तिन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.