सोलापूर : वडिलोपार्जित जमिनीची वाटणी आणि जमिनीच्या हिश्यातून आलेली रक्कम न देण्याच्या कारणावरून गंभीर आजार असलेल्या पुतण्याला बेदम मारहाण करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी चुलत्यासह दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका दिवंगत माजी आमदाराच्या कुटुंबातील कलहातून हा प्रकार घडला.
विनोद सुरेश पाटील (वय ३४, रा. केशवनगर, दक्षिण सदर बझार, सोलापूर) असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. जुळे सोलापुरातील रेणुकानगरी परिसरात हा प्रकार घडला असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे.
याबाबत जखमी विनोद पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यास यकृताचा आजार आहे. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी त्यांच्यावर यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. दरम्यान, विनोद हा आपल्या चुलत्याच्या घरी जुळे सोलापूर भागात गेला असताना त्याचा चुलत भाऊ आणि चुलता या दोघांनी त्याच्याशी शेतजमिनीवरून मारहाण करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यात संबंधित चुलता आणि चुलत भावाला अटक झाली नाही.