सोलापूर : दुष्काळी मंगळवेढा तालुक्यात उष्णतेची धग वाढली असताना पाणी पिण्यासाठी गेलेल्या एका ८ वर्षांच्या तहानलेल्या मुलीचा शेततळ्यात पाय घसरुन पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेची मंगळवेढा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की मंगळवारी दुपारी आडीचच्या सुमारास तनिष्का आप्पासो चव्हाण ही संत दामाजी साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या किरण दत्तू यांच्या शेततळ्यावर पाणी पिण्यासाठी गेली होती. शेततळ्यात उतरली असता अचानकपणे ती पाय घसरून पाण्यात पडून बुडाली.

हेही वाचा…मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही – नरेंद्र मोदी

यात तिचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती विठ्ठल जाधव यांनी मंगळवेढा पोलिसांना दिली. यंदाच्या तीव्र उन्हाळा आणि दुष्काळात पाणीटंचाई प्रचंड प्रमाणावर भेडसावत असताना तहानलेल्या छोट्या जीवाला पाण्यासाठी स्वतःचा जीव गमवावा लागल्याची ही पहिलीच घटना मानली जाते.