सोलापूर महानगरपालिकेचे धडाकेबाज आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची अखेर शासनाने बदली केली असून त्यांना ग्रामविकास विभागात पाठविण्यात आले आहे. सोलापूरकरांचा असलेला तीव्र विरोध डावलून गुडेवार यांच्या बदलीच्या आदेशावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी दुपारी शिक्कामोर्तब केले. त्यांच्या बदलीसाठी महापालिकेतील कारभारी, बिल्डर्स मंडळी व धनदांडग्यांनी व त्यांच्या हितसंबंधी राजकीय पुढाऱ्यांनी गुडेवार यांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणल्याचा आरोप केला जात आहे.
दरम्यान, गुडेवार यांची बदली होणार याची कुणकुण लागल्याने सकाळपासूनच महापालिकेजवळ पार्क चौकात सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन गुडेवार यांची बदली रद्द व्हावी म्हणून स्वाक्षरी मोहीम हाती घेतली असता त्यास नागरिकांचा भरभरून प्रतिसाद लाभत आहे. गुडेवार यांची बदली करून काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी चांगले केले नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आघाडीला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत सार्वत्रिक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या नेतृत्वाखालील प्रबुद्ध भारत मंडळाच्या वतीने सुरू केलेल्या स्वाक्षरी मोहिमेत हजारो नागरिक सहभागी होत असल्याचे चित्र सायंकाळी दिसून आले. यात तरुणांबरोबर महिलांचाही सहभाग लक्षणीय दिसून आला. तर दुसरीकडे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर माकपच्या वतीने गुडेवार यांच्या बदलीच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात माकपचे नगरसेवक माशप्पा विटे, महादेवी अलकुंटे, सुनंदा बल्ला यांच्यासह माजी नगरसेवक व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी आदींचा प्रामुख्याने सहभाग होता. सुशीलकुमार शिंदे यांच्या दबावामुळेच अन्यायकारकपणे गुडेवार यांची बदली झाल्याचा आरोप आडम मास्तर यांनी केला. ही बदली रद्द होण्यासाठी ‘सोलापूर बंद’ पुकारण्याचा इशारा आडम मास्तर यांनी दिला.
आयुक्त गुडेवार यांनी आपल्या बदलीचा आदेश निघाल्याचा आपणास तोंडी निरोप मिळाला. मात्र लेखी आदेश अद्यापि आला नाही. आदेश येताच आपण पदभार सोडणार असल्याचे प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगतिले. सध्या त्यांच्याकडे महापालिकेबरोबरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचाही अतिरिक्त भार आहे. दरम्यान, गुडेवार यांच्या ठिकाणी नवे आयुक्त म्हणून मालेगाव महापालिकेचे आयुक्त अजित जाधव हे येणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, आयुक्त गुडेवार यांना गेल्या महिन्यात पाणीप्रश्नाचे निमित्त पुढे करून काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी आयुक्त दालनासमोर ‘चले जाव’च्या घोषणा देत त्यांचा अवमानही केला होता. त्या वेळी मनस्ताप झाल्याने गुडेवार यांनी तात्काळ विनंती बदलीचा अर्ज शासनाकडे पाठवून निघून जाणे पसंत केले असता त्या वेळी लगेचच ‘काम बंद’ आंदोलन करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणारे महापालिका कर्मचारी संघटनेचे नेते अशोक जानराव यांनी सोमवारी गुडेवार यांच्या बदलीचा आदेश निघाल्यानंतर आश्चर्यकारकरीत्या घूमजाव केले. जोपर्यंत प्रत्यक्ष बदलीचा आदेश निघत नाही, तोपर्यंत आपण कोणताही निर्णय घेणार नाही. स्वत: गुडेवार यांनी बदली करून घेतल्याचा शोधही त्यांनी लावला असून, यात त्यांनी स्वत: मॅटकडे धाव घेतल्यास आपण त्यांच्या पाठीशी राहू, अशी साळसूदपणाची भूमिका जानराव यांनी घेत एकाकीपणे मवाळ धोरण स्वीकारल्याचे दिसून आले. त्यांच्या या भूमिकेमागचे कोडे उमगले नसल्याने पालिका कर्मचारीवर्गही आश्चर्यचकित झाला आहे.
दरम्यान, आतापर्यंत आयुक्त गुडेवार यांच्यापाठीशी ठामपणे उभे राहणाऱ्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी गुडेवार यांच्या बदलीशी आपला किंवा सुशीलकुमार शिंदे यांचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला. त्यांची बदली हा शासनाच्या अखत्यारीतील नेहमीचा भाग असावा, असे त्यांनी नमूद केले. मात्र गुडेवार यांची झालेली बदली रद्द होण्यासाठी आपले काय प्रयत्न असतील, हे स्पष्ट झाले नाही.
हितसंबंध दुखावल्याची शिक्षा?
सोलापूर शहरात महाराष्ट्र स्वर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत सुरू असलेल्या ३३२ कोटी खर्चाची ५९ किलोमीटर लांबीची रस्तेविकासाची कामे मुंबईच्या युनिटी कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत सोलापूरच्या मेहुल कन्स्ट्रक्शन कंपनीने हाती घेतली आहेत. परंतु या रस्तेकामांना कमालीचा विलंब होत असल्याने त्याची दखल घेत आयुक्त गुडेवार यांनी संबंधित मक्तेदाराला नोटीस बजावून ३१ मेपर्यंत काम पूर्ण न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला होता. गुडेवार यांची ही भूमिका हितसंबंधी नेतृत्वाला रुचली नाही. एवढेच नव्हेतर अश्विनी सहकारी रुग्णालयाने सात रस्ता येथील महापालिका परिवहन उपक्रमाच्या सबडेपोची सुमारे २० हजार चौरस मीटर एवढी जागा मागितली असता त्यावर आयुक्त गुडेवार यांनी पालिकेचे हित विचारात घेत कळवलेला नकारात्मक अभिप्राय तसेच सुशील रसिक सभागृहाच्या बेकायदा बांधकामाविरोधातील भूमिका, यामुळे त्यांच्याविषयीच्या सोलापूरचा तथाकथित ‘स्वाभिमान’ जपणाऱ्या नेत्याच्या नाराजीत भर पडल्याचे सांगितले जाते.