काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजपावर टीका करताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर देखील मोठा आरोप केल आहे. शिवाय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोग्यांच्या मुद्य्यावरून केलेल्या विधानांवर देखील प्रतिक्रिया देताना निशाणा साधला आहे.

“आज जी मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी वाढली आहे, अर्थव्यवस्था कोलमडली आहे, महागाई प्रचंड वाढलेली आहे. सर्व गोष्टींचे दर वाढलेले आहेत. हे सगळं अपयश लपवण्यासाठी धर्माचा आधार घेऊन, समाजात तेढ निर्माण करण्याचं काम भाजपा या देशात करत आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. आज जे काही अपयश आहे ते लपवण्यासाठी आता हे लोक(भाजपा) रक्तपातापर्यंत आले आहेत.” असा आरोप अतुल लोंढे यांनी भाजपावर केला आहे.

तसेच, “माझा तर स्पष्ट आरोप आहे की मागील सात वर्षांमध्ये या देशाचं मानसिक विभाजन भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने घडवून आणलेलं आहे. आज समाजात तिढा निर्माण होऊन संपूर्ण देश त्यात होरपळतो आहे. ” असंही त्यांनी बोलून दाखवलं आहे.

याचबरोबर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिंदीवरील भोंगच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. शिवाय, भोंगे जर काढले नाहीत तर सामूहिक हनुमान चालीसा वाचन केले जाईल, असा इशाराही दिला आहे. यावरून देखील अतुल लोंढे यांनी टीका केली आहे.

“प्रभूरामचंद्र, श्री हनुमान हे किंवा बाकी ज्या आमच्या आस्था, श्रद्धा आहेत. त्या व्यक्तिगत असाव्यात असं, संविधानात दिलेलं आहे. प्रत्येकाला त्याच्या धर्माचे अनुसरण करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. पण दुसऱ्यावर कुरघोडी करण्याचा अधिकार प्रभूरामचंद्र देखील देणार नाहीत. ते प्रजा हीत दक्ष राजा होते. राजकारणासाठी जो देवांचा वापर केला जातोय त्याचा आम्ही विरोध करतोय. नाहीतर असा कोणता हिंदू आहे की जो रामाची पूजा करत नाही, हनुमानाची पुजा करत नाही? त्यासाठी भोंगे लावून प्रदर्शन करणे म्हणजे फक्त राजकारणासाठी आम्ही दोन भाग करतो आणि यातून आम्हाला मत कसे मिळतील, यासाठीच हा प्रयत्न आहे.” असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.

याशिवाय, “आमचा प्रभूरामचंद्राच्या नावावर सुरू असलेल्या राजकारणाला विरोध आहे, हनुमान चालीसा वाचायची असेल तर या आमच्यासोबत मंदिरात बसून वाचू आपण. हनुमान चालीसाचं वाचन मंदिरात किेंवा घराघरात करण्याचं हे का आवाहन करत नाही?” असा सवाल देखील त्यांनी राज ठाकरे यांना उद्देशून केला आहे.