सुनंदा मेहता आणि पवन खेंगरे
शिवतेज शंकर यादव, त्याचे भाऊ आणि वडील यांच्या ८ गाड्या आहेत. यामध्ये ६ मोटारसायकल, एक स्कूटर आणि एक चारचाकी गाडीचा समावेश आहे. गाड्यांच्या संख्येपेक्षा गाड्यांना देण्यात आलेला नंबर तुमचं लक्ष वेधून घेतो. प्रत्येक गाडीला ०५५४ हा नंबर आहे. ‘हा आमचा फॅमिली नंबर आहे. आम्ही हा नंबर निवडला यामागे कारण आहे. आमच्या सगळ्यांच्या नावाची आद्याक्षरं ssy आहेत आणि इंग्रजीत 554 ठराविक पद्धतीने लिहिलं तर तर ते ssy असं दिसतं’, २७ वर्षीय शिवतेज नंबरमागची गोष्ट सांगतात. या कुटुंबांचं फर्निचरचं वर्कशॉप आहे.
समोरच्या रस्त्यावर त्यांचे शेजारी साजराव साळुंखे राहतात. त्यांचं सलून आहे. त्यांच्या घराबाहेर ३ मोटारसायकल उभ्या दिसतात. प्रत्येकीचा नंबर १३१४ आहे. या आकड्याची बेरीज ९ आहे. ९ हा आमचा लकी आकडा आहे असं साजराव सांगतात.
संपतराव दळवी यांच्या दोनखणी घरासमोर असंख्य गाड्या उभ्या दिसतात. २५ जणांचं एकत्र कुटुंब असलेल्या या घराच्या मिळून ११ गाड्या आहेत. असंख्य मोटारसायकलच्या बरोबरीने एक चारचाकी आणि ईव्ही स्कूटरही आहे. सगळ्यांचा नंबर ८२८२ आहे. ‘रिदमचा विचार करून आम्ही हा नंबर घेतला आहे. ब्यांऐशी ब्यांऐशी यात एक लय आहे’, असं ७२ वर्षीय संपतराव सांगतात.
अतरंगी नंबरप्लेटची आवड जोपासणारं हे गाव आहे प्रयाग चिखली. कोल्हापूर जिल्ह्यात हे गाव आहे. इथे घरोघरी अतरंगी नंबरप्लेट दिसते. तीन दशकं १९०० उंबऱ्यांचं आणि १०,००० लोकसंख्या असणाऱ्या या गावातल्या गाड्यांना स्पेशल रजिस्ट्रेशन नंबरप्लेट आहेत.
‘जेव्हाही आम्ही मोटारसायकल किंवा गाडी पाहतो, तेव्हा आम्ही नंबरप्लेटकडे पाहतो. ती गाडी कोणाची आहे हे आमच्या लगेच लक्षात येतं. ८२८२ नंबर दिसला तर दळवी कुटुंबातली गाडी आहे. ५१५१ नंबर दिसला तर राजपूतांच्या घरची गाडी आहे, ७७७७ नंबर असेल तर पांडुरंग यादवांच्या घरची गाडी आहे’, असं बाबुराव पाटील सांगतात. ४५वर्षीय पाटलांचा गुळाचा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे ४ मोटारसायकल आहेत. सगळ्यांचा नंबर ७००० आहे. कारण काय? विचारलं असता ते म्हणाले, ‘७ हा आमच्यासाठी लकी आकडा आहे’.
स्थानिकांच्या मते अतरंगी नंबरप्लेट्सची सुरुवात पांडुरंग यादव यांनी केली. यादव स्थानिक राजकारणी आणि शेतकरी आहेत. प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांचे ते शेजारी आहेत. चिखली हे वाडकरांचं मूळ गाव. ‘यादव यांनी ७७७७ हा नंबर घेतला. १९९० मध्ये त्यांनी पहिली मोटारसायकल घेतली तेव्हा हा नंबर निवडला. त्यानंतर त्यांनी घेतलेल्या प्रत्येक गाडीला हाच नंबर आहे. बाकी गावकऱ्यांनी पांडुरंग यांच्या ट्रेंडचं अनुकरण केलं. आजच्या घडीला चिखली गावातल्या ७५ टक्के गाड्यांना अशा अनोख्या नंबरप्लेट आहेत, असं सरपंच रोहित पाटील यांनी सांगितलं.
‘आमचं गाव अनोख्या नंबरच्या नंबरप्लेटसाठी ओळखलं जातं’, असं ३३वर्षीय पाटील सांगतात. त्यांच्या सगळ्या गाड्यांना ३५०० हाच नंबर आहे. ‘माझ्या आजीने ३० वर्षांपूर्वी हा नंबर निवडला. माझ्या वडिलांनी त्याचं अनुकरण केलं आणि आता मीही. हा नंबर आमच्या कुटुंबाची ओळखच झाली आहे’, असं ते सांगतात. रोहित कोल्हापूरच्या प्रसिद्ध गोकुळ डेअरीत काम करतात.
‘ज्याला गाडी घ्यायची असते तो आरटीओकडे जो नंबर हवा आहे त्यासाठी विनंती करून अर्ज भरतात. तो नंबर मिळाला की मग गाडी घेतली जाते. गावात ३,००० ते ४,००० गाड्या आहेत’, असं रोहित सांगतात.
व्हीआयपी किंवा स्पेशल नंबर अतिरिक्त शुल्क भरून घेता येतात. चिखलीचे ग्रामस्थ ही रक्कम भरायला आनंदाने तयार असतात. गावातला प्रत्येकजण सधन नाही पण गाडीच्या नंबरप्लेटसाठी जास्तीचे पैसे भरायला ते आनंदाने तयार असतात. विशेष नंबरसाठी लोक ५,००० ते ५०,००० यादरम्यानची कितीही रक्कम भरतात. गाडी विकत घेताना तिच्या किंमतीबरोबरीने नंबरप्लेटसाठी येणाऱ्या खर्चासाठीही जुळवाजुळव केली जाते.
खास नंबरसाठी प्रचंड मागणी असल्याने कोल्हापूरच्या आरटीओतर्फे सातत्याने लिलाव आयोजित करतात. ‘काल आम्ही नंबरची सीरिज खुली केली. पहिल्याच दिवशी आमच्याकडे ३४५ विनंतीअर्ज आले. मोटारसायकलसाठी विशिष्ट नंबरची मागणी सर्वाधिक आहे. प्रयाग चिखली गावातल्या अतरंगी नंबरप्लेटची आकडेवारी आमच्याकडे नाही पण या परिसरात, भागात विशेष नंबरप्लेट ठेवण्याचा ट्रेंड प्रचंड आहे’, असं डेप्युटी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर मनोज गजानन ओतारी सांगतात.
‘१ ते ९० नंबरसाठी असंख्य अर्ज येतात’, असं ओतारी सांगतात. अशावेळी ट्रान्सपोर्ट ऑफिसद्वारे डिमांड ड्राफ्ट मागवले जातात. पारदर्शकतेसाठी ज्यांना तो विशिष्ट नंबर हवा आहे त्या सगळ्यांच्या उपस्थितीत लिफाफा उघडला जातो. दसरा आणि दिवाळी नंबरसाठी लिलाव मोठ्या प्रमाणावर होतात.
‘काही वेळेला नव्या नंबरच्या सीरिजसाठी आमच्याकडे १२,००० अर्ज येतात. अशावेळी लिलाव तीन तासापेक्षा जास्त वेळ चालतो. कोल्हापूरात MH09 हा नंबर आहे. त्यामुळे ९ शी निगडीत नंबरांना प्रचंड मागणी आहे असं ओतारी सांगतात. १००८ हाच नंबर हवा यासाठी एका मोटारसायकल ग्राहकाने दीड लाख रुपये मोजले. त्याच्या गाडीची किंमत त्यापेक्षा बरीच कमी होती’.
आरटीओ संजीव भोर सांगतात, ‘पुण्यात १ किंवा १००० या नंबरांना प्रचंड मागणी असते. एक प्रसंग त्यांनी सांगितला. पुण्यात चारजणांना १२१२ हा नंबर हवा होता. पुण्याचा कोड MH12 आहे. १२१२ नंबरसाठी ३ लाख रुपये मोजावे लागणार होते. पण त्यांनी भरले. चिखली गावात कुटुंबाचा नंबर ठरलेला असतो. त्याप्रमाणे गोष्टी होतात. ही एक अलिखित परंपरा आहे, तो आता ट्रेंड झाला आहे. काहींच्या बाबतीत स्टेटस सिम्बल झालं आहे’.
प्रयाग चिखली गावकऱ्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. गाड्यांसाठी विशेष नंबर मिळवलेल्या गावकऱ्यांनी आपला मोबाईल नंबरही तसाच असावा यासाठी प्रयत्नशील आहेत. ‘माझा मोबाईल नंबर ३५०० आहे. माझ्या मोबाईल नंबरचा शेवटही ३५०० असायला हवा’, असं सरपंच रोहित पाटील सांगतात.
