वसई-विरारमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस कोसळत असताना एका खासगी व्हॅनच्या चालकाने स्वत:च्या प्राणाचे बलिदान देऊन चार शाळकरी मुलांचे प्राण वाचवले. प्रकाश पाटील (४४) असे या धाडसी वाहन चालकाचे नाव असून तो वसई येथे राहायला होता. सध्या गावकऱ्यांमध्ये प्रकाशच्या शौर्याची चर्चा सुरु आहे. सोमवारी प्रकाशने नेहमीप्रमाणे मुलांना शाळेबाहेरुन पीकअप केले व मुलांना घेऊन तो घराच्या दिशेने वसईला येत होता.

त्यावेळी मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे दृश्यमानता कमी होती व रस्त्यात पाणी साचले होते. प्रकाशच्या व्हॅनमध्ये मॅट्रीक्स अॅकेडमी स्कूलची मुले बसली होती. प्रकाशची गाडी काहरोडी जंक्शनजवळ पोहोचली त्यावेळी मुसळधार पाऊस सुरु होता आणि दृश्यमानता खूपच कमी होती. त्या भागामध्ये तीन फूट पाणी साचले होते.

प्रकाशची गाडी जिथे होती त्या भागातून एक नालाही वाहतो. पावसामुळे रस्ता आणि नाला यामधला फरक ओळखता येत नव्हता. त्यावेळी प्रकाशने गाडी पुढे नेली असे अर्नाळा पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रकाशला पुढे काही तरी धोका आहे याची जाणीव होताच त्याने गाडी थांबवली व मुलांना गाडीतून उतरवले.

त्यानंतर त्याने मुलांना सुरक्षित ठिकाणी नेऊन उभे केले. त्या दरम्यान दोन मुले घसरली व पाण्यात वाहून चालली होती. त्याने दोन्ही मुलांना बाहेर काढले व सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. हे सर्व करत असताना प्रकाश नाल्याच्या टोकावर उभा होता. मुसळधार पावसामुळे त्याचा तोल गेला व तो पाण्यात वाहून गेला असे पोलिसांनी सांगितले. प्रकाश पाण्यात पडल्यानंतर मुलांनी आरडाओरडा केला व स्थानिकांना याची माहिती दिली. दुर्घटना घडल्यानंतर पुढच्या वीस मिनिटात घटनास्थळपासून दीड किलोमीटर अंतरावर प्रकाशचा मृतदेह सापडला.