मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते शेलू बाजार, वाशिम, असा २१० किमीच्या मार्गाचे २ मे रोजी होणारे उद्घाटन अखेर रद्द करण्यात आले आहे. काही तांत्रिक कारणांमुळे उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी ‘लोकसत्ता”ला दिली.

एमएसआरडीसीकडून नागपूर ते शेलू बाजार अशा २१० किमीच्या मार्गासाठी मुहूर्त ठरविण्यात आला होता. त्यानुसार यासाठीची जय्यत तयारी सुरू होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार होते. मात्र आता अचानक हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

नागपूरपासून १५ किमीवर समृद्धी महामार्गावर वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या ओव्हरपासचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. या कामादरम्यान ओव्हरपासला तडे गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता नव्याने या ओव्हरपासचे काम करावे लागणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतरच २१० किमीचा महामार्ग सुरू करणे शक्य होणार आहे. त्यामुळे २ मे चे उद्घाटन रद्द करण्यात आल्याची माहिती मोपलवार यांनी दिली.

वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही –

या संदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने निवेदनाद्वारे कळवण्यात आले आहे की, “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या १५ व्या किलोमीटरमध्ये वन्यजीव उन्नत मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. या उन्नत मार्गाचे सुपर स्ट्रक्चर हे आर्च पद्धतीचे आहे. हे काम ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. सदर काम अंतिम टप्प्यात असताना त्यातील१०५ पैकी काही आर्च स्ट्रीप्सला अपघाताने हानी पोहचील आहे. तज्ज्ञांसोबत पाहणी आणि चर्चा करून, नवीन पद्धतीचे सुपर स्ट्रक्चर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे काम दीड महिन्याच्या कालावधीत पूर्ण होईल. वन्यजीव उन्नत मार्ग पूर्ण झाल्याशिवाय महामार्ग वाहतुकीसाठी खुला करता येणार नाही. त्यामुळे, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शेलू बाजारदरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले आहे.” असं महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्यावतीने जनसंपर्क अधिकारी तुषार आहिरे यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.