scorecardresearch

गोपीनाथ मुंडे उसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन

दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन पुणे सामाजिक न्याय भवनात  उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले.

प्रतिनिधीक छायाचित्र

बीड : दिवंगत गोपीनाथ मुंडे ऊसतोडणी कामगार कल्याण महामंडळाच्या राज्यस्तरीय कार्यालयाचे उद्घाटन पुणे सामाजिक न्याय भवनात  उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दूरदृश्य प्रणाली संवादाच्या माध्यमातून उपस्थित होते. या वेळी प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी केलेल्या उसतोड कामगारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. पुणे येथे राज्यस्तरीय तर परळी येथे प्रादेशिक कार्यालय असणार आहे. ऊस गाळपातून कारखान्यांकडून प्रतिटन दहा रुपये आणि राज्य शासनाकडून दहा रुपये असा प्रतिटन वीस रुपये निधी उपलब्ध होणार असून पहिल्याच वर्षी मंडळाला दोनशे कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी उपलब्ध होणार आहे.

महामंडळातर्फे उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वसतिगृह आणि इतर योजना राबविण्यात येणार आहेत. बीड जिल्ह्यातून ऊसतोडणीसाठी सर्वाधिक कामगार साखर कारखान्यांमध्ये सहा महिन्यांसाठी काम करतात. गोपीनाथ मुंडे यांनी उसतोड कामगारांचे नेतृत्व करून सरकारकडे पाठपुरावा केला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुढाकार घेऊन हे महामंडळ सुरू केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिल्याच अर्थसंकल्पात मंडळासाठी आर्थिक तरतुदीची घोषणा केली. महामंडळाच्या अंतर्गत धनंजय मुंडे यांनी राज्यातील चौदा जिल्ह्यात संत भगवानबाबा निवासी वस्तीगृह सुरू केले आहे. तर पुणे, नाशिक, औरंगाबाद या शहरातून केवळ उसतोड कामगारांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी सरकार आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऊसतोड कामगारांना विमा संरक्षणाबरोबरच महिलांना आरोग्य सुविधा देण्याचाही प्रयत्न मंडळाकडून केला जाणार आहे. सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंतराव भांगे, साखर आयुक्त शेखर गायकवाड, व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inauguration state level office gopinath munde ustodani kamgar kalyan mahamandal ysh

ताज्या बातम्या