सांगली : भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्या विहिरीत पडल्याची घटना ऐतवडे ता. वाळवा येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली असून, त्याच्या बचावाचे कार्य वनविभागाने हाती घेतले आहे.
आप्पासो नेमगोंडा पाटील-शिरोटे हे आज सकाळी शेतामध्ये विहिरीवरील पंप सुरू करण्यासाठी गेले असता त्यांना विहिरीत बिबट्या आढळून आला. पाण्यात विहिरीच्या कडेला हा बिबट्या होता. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती वन विभागाला दिली. बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
भगवान गायकवाड, श्री. भगले, अनिल पाटील, भिवा कोळेकर, आश्विनी वाघमारे, निवास उगळे आदी वन कर्मचारी बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला सुरक्षित वर काढण्यासाठी क्रेनही मागविण्यात आली असून, सायंकाळी उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होते.