scorecardresearch

अलिबाग: फुल शेतीतून समृद्धीकडे वाटचाल, कार्ले येथील सतीश म्हात्रे यांची यशोगाथा

पांरपारीक पिकाला फाटा देऊन फुलशेती आणि भाजीपाला लागवड केली तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.

flower farming
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग: कोकणातील शेती हा आतबट्ट्याचा व्यवहार ठरत असल्याची ओरड नेहमी होते. पण पांरपारीक पिकाला फाटा देऊन फुलशेती आणि भाजीपाला लागवड केली तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते. अलिबाग तालुक्यातील कार्ले गावातील सतीश म्हात्रे यांनी हेच सिध्द करून दाखवले आहे. फुलशेती लागवडीतून ते महिन्याला तीस हजार रुपयांचे उत्पन्न घेत आहेत तर भाजीपाला लागवडीतूनही त्यांना महिन्याला चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.

रायगड जिल्ह्यात भात हे प्रमुख पिक आहे. दरवर्षी खरीपात १ लाख हेक्टरवर भात पिकाची लागवड केली जाते. शेतमजुरी आणि लागवड खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या हाती फारसे काही लागत नाही. त्यामुळे दरवर्षी भातलागवडीखालील क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येत आहे. तरुण पिढी शेतीपासून दुरावत चालली आहे. शेतीकरण्यापेक्षा जमिनी विकण्याकडे तरुण शेतकऱ्यांचा भर आहे. मात्र योग्य नियोजन केले तर कोकणातील शेती फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी योग्यवेळी योग्य पिकाची लागवड करणे आवश्यक आहे.

आणखी वाचा- आरोपी ज्या कंपनीत काम करायचा तिथल्या कामगारांच्या दुचाकी चोरायचा

कार्ले गावातील सतीश म्हात्रे खरीपात भाताची लागवड करतात. भात कापणीनंतर त्यांच्या शेतात पांढऱ्या कांद्याची लागवड केली जाते. हे पिक ९० दिवसात तयार होते. फेब्रुवारी अखेरपर्यंत कांदा तयार होतो. ज्याला बाजारात प्रचंड मागणी असते. त्यामुळे चांगला दरही मिळतो. शेताच्या बांधावर शंभर टक्के कांद्याची विक्री होते. कांद्यानंतर सतीश म्हात्रे फुलशेती करतात. प्रजातीच्या फुलझाडांची लागवड ते करतात. कमी महेनतीत याचे भरघोस उत्पादन होते. स्थानिक बाजारपेठेत प्रती शेकडा दराने या फुलांची विक्री होते. यातून दररोज एक ते दीड हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळण्यास सुरवात झाली.

फुलशेती बरोबरच तोंडली लागवड त्यांनी केली. अलिबाग परिसरातील तोंडल्यांना मुंबईतील बाजारपेठेत मोठी मागणी असते. त्यामुळे या तोंडल्यांना चांगला दर मिळतो. शेताच्या बांधावरून प्रतिकीलो ५५ रुपये दराने तोंडली खरेदी होते. यातून शेतकऱ्यांना खर्च वजा जाऊन चांगले उत्पन्न मिळते. भात लागवडीतून शेतीला फारसे उत्पन्न मिळत नसले तरी ती कसर पांढरा कांदा, तोंडली आणि फुलशेती लागवडीतून भरून निघते. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ खरीपातील भात पिकावर अवलंबून राहून उपयोग नसल्याचे म्हात्रे सांगतात.

कोकणातील शेतीत पैसा मिळत नाही असे अजिबात नाही. पण त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. बाजारातील मागणी लक्षात घेऊन पिकांची लागवड करावी लागते. ज्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगला दरही मिळतो. पांढरा कांदा, फुलशेती आणि तोंडली लागवडीतून आम्हाला मुबलक उत्पन्न मिळते. शेताच्या बांधावर आणि स्थानिक बाजारपेठेत सर्व माल विकला जातो. -सतीश म्हात्रे, प्रयोगशील शेतकरी, कार्ले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 10:19 IST

संबंधित बातम्या