१००० कोटींच्या संपत्तीसंदर्भातील नोटीसमध्ये अजित पवारांच्या नक्की कोणत्या संपत्तीचा उल्लेख?; समोर आला तपशील

आयकर विभागाने पाठवलेली नोटीस ही राज्यातील सत्ताधारी ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात असल्याची चर्चा आहे

Ajit Pawar Income Tax
आयकर विभागाने पाठवली नोटीस (प्रातिनिधिक फोटो)

महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीमधील प्रमुख घटक पक्षांपैकी एक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. बेनामी संपत्ती प्रकरणी भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आरोप केल्याच्या दुसऱ्याच दिवशी आयकर विभागाकडून ही नोटीस देण्यात आलीय. या नोटीसमध्ये अजित पवार यांच्याकडील कोणत्या संपत्तीचा उल्लेख आहे याबद्दलचा तपशील समोर आला आहे.

आयकर विभागाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांच्या बेनामी संपत्तीच्या यादीमध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश नोटीसमध्ये केलाय याची माहिती सुत्रांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने समोर आणलीय. अजित पवार यांच्याकडील एक हजार कोटींच्या संपत्तीसंदर्भातील ही नोटीस आहे. यामध्ये एकूण पाच ठिकाणच्या संपत्तीचा उल्लेख आहे. ज्यात मुंबईमधील नरीमन पॉइण्टवरील नरीमन टॉवरचाही समावेश आहे. यासंदर्भातील माहिती आयकर खात्याने या नोटीसीमध्ये दिल्याचं सांगण्यात आलंय. मागील महिन्यामध्येच आयकर खात्याने अजित पवार यांच्या बहिणींशीसंबंधित कंपन्यांवर छापेमारी करुन तपास केला होता, असं एएनआयने म्हटलं आहे.

आयकर विभागाने पाठवलेली नोटीस ही ठाकरे सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. कालच सोमय्या यांनी अजित पवारांकडे एक हजार कोटींहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचे आरोप केले होते. या प्रकरणामध्ये सोमय्या यांनी अजित पवारांची आई, पत्नी आणि त्याचबरोबर पवार कुटुंबियांच्या जावयाचाही हात असल्याचा आरोप केला होता.

सोमय्या नक्की काय म्हणालेले?
मी दिवाळीनंतर बोलणार होता, पण पवार साहेबांना घाई झालीय, असं म्हणत आपण तीन जावयांचा घोटाळा समोर आणणार असं म्हणालो होतो त्याप्रमाणे आज आपण पवारांचे जावाई मोहन पाटील यांच्या मार्फत झालेल्या व्यवहारांबद्दल भाष्य केलं होतं. जरंडेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून अजित पवारांच्या खात्यात शेकडो कोटी आलेत. हे पैसे बिल्डरांनी दिले आहेत. हे सर्व सर्व त्यांनी कुटुंबियांच्या खात्यात वळवल्याचा आरोप सोमय्यांनी केलाय. ए. ए. पवार यांच्याबरोबरच अजित पवार यांनी स्वत:च्या आईच्या खात्यातही हे पैसे वळवले आहेत. मोहन पाटील, वियजा पाटील, सुनेत्रा पवार यांचे सगळे काळे कारभार तिकडनं होतात असंही सोमय्या म्हणाले.

पवार हे नवाब मलिकांना आता पुढे करत आहेत
पवार कुटुंबियांविरोधात होणाऱ्या आयकरच्या कारवाईपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी शरद पवार हे नवाब मलिकांना आता पुढे करत असल्याचंही सोमय्या म्हणाले आहेत. वानखेडेंच्या पहिल्या लग्नाच्यावेळी ते का गप्प बसले?, सेवेत आले तेव्हा का गप्प बसले?, असा प्रश्न सोमय्या यांनी मलिक यांना विचारला आहे. पवार परिवारानं महाराष्ट्राला खूप लुटलंय, असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक रोज उठून दाऊद दाऊद करतात कारण हे नाव त्यांना अत्यंत जवळचं आहे, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Income tax department has attached properties of maharashtra deputy cm ajit pawar worth rs 1000 cr scsg

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या