जाधवांघरच्या विवाहाशी प्राप्तिकर चौकशीचा संबंध नाही!

नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या चिरंजीव व कन्येच्या शाही विवाहाच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरच्या प्राप्तिकर विभागाने संबंधितांवर छापे घातले नसून, फक्त नियमानुसार तपासणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांच्या चिरंजीव व कन्येच्या शाही विवाहाच्या पाश्र्वभूमीवर कोल्हापूरच्या प्राप्तिकर विभागाने संबंधितांवर छापे घातले नसून, फक्त नियमानुसार तपासणी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. चिपळूणमध्ये गेल्या १३ फेब्रुवारी रोजी झालेल्या या विवाह सोहळय़ासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री व विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी तसेच जिल्हय़ातील रहिवाशांनी मोठय़ा प्रमाणात हजेरी लावली. उत्तम सजावट आणि विद्युत रोषणाई केलेल्या मैदानावर हा सोहळा पार पडला. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या टिप्पणीमुळे त्यात आणखी भर पडली.
या पाश्र्वभूमीवर प्राप्तिकर  विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी कराड येथील प्रसिद्ध कॅटरर व काँट्रॅक्टर शहा यांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. तसेच चिपळूणमध्ये येऊन या विवाह सोहळय़ासाठी विविध कंत्राटे देण्यात आलेल्या व्यक्ती व संस्था आणि खुद्द पालकमंत्री जाधव यांच्याकडेही खर्चाबाबत चौकशी करून माहिती घेतली. त्यामुळे पुन्हा या विषयावरील चर्चेला उधाण आले. मात्र प्राप्तिकर विभागाच्या अधिकारी ठाकूर यांनी, हे विभागातर्फे घातलेले छापे नसून केवळ नियमानुसार तपासणी करण्यात आल्याचे सोमवारी संध्याकाळी उशीरा स्पष्ट केले. या खर्चाच्या तपशिलाबाबत विसंगती आढळल्यास दंड करण्याचे अधिकार विभागाला असल्याचेही विभागातर्फे नमूद करण्यात आले. पण त्याबाबतचा निष्कर्ष अजून जाहीर करण्यात आलेला नाही.
हे सारे चॅनेलच्या टीआरपीसाठी!
दरम्यान, जाधव यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेचा तपशील सांगण्याबाबत त्यांनी असमर्थता दर्शवली, पण ‘एखाद्या विषयाला आधी वारेमाप प्रसिद्धी द्यायची आणि नंतर आमच्यासारख्या संबंधितांचे खुलासेही घ्यायचे, हा या चॅनेलवाल्यांचा टीआरपी वाढवण्याचा धंदाच आहे,’ अशा शब्दांत त्यांनी नापसंती नोंदवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Income tax enquiry of bhaskar jadhav has no link with his daughter wedding