टाळेबंदीच्या वर्षांतही महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ

मुंबई-आग्रा, नागपूर-सुरत महामार्गावर अधिक अपघात

(संग्रहित छायाचित्र)

संतोष मासोळे

वाहतूक पूर्णपणे खुली असताना रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूचे आकडे चिंता वाढविणारे ठरतात. पण करोनाच्या टाळेबंदीत सलग काही महिने वाहतुकीवर निर्बंध असतानादेखील धुळे जिल्ह्य़ात  मुंबई-आग्रा आणि नागपूर-सूरत महामार्गावर सर्वाधिक अपघात आणि अपघाती मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. या काळात अपघातात गंभीर जखमी आणि अपंगत्व आलेल्यांची संख्यादेखील मोठी आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदीच्या काळात कुठल्याही महामार्गावर अन्य खासगी वाहने दृष्टीस पडत नव्हती. रेल्वे आणि खासगी वाहतुकीवर निर्बंध होते. हळूहळू निर्बंध शिथिल झाले तशी महामार्गावरील वाहनांची वर्दळ वाढली. अनेक महिने खासगी वाहने रस्त्यावर नसल्याने २०२० या वर्षांत अपघात, त्यातील मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित होते. परंतु तसे घडले नाही. उलट २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये अपघात आणि मृत्यूंची संख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

करोना काळातदेखील महामार्ग मृत्यूचे सापळे बनले. २०१९ वर्षांत जिल्ह्य़ातील लहान-मोठय़ा अपघातांची संख्या ८६० होती. ती २०२० वर्षांत काही महिने टाळेबंदी, संचारबंदी असूनही ८७२ वर गेली. जिल्ह्य़ात २०१९ या वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये ३१३ जणांचा मृत्यू झाला होता. २०२० या वर्षांत अपघाती मृत्यूंचा आकडा ३८४ वर पोहोचला. अपघातात जखमी झालेल्यांचे प्रमाण करोनाच्या वर्षांत लक्षणीय वाढले. २०१९ मध्ये विविध अपघातात ४९६ जण जखमी झाले होते. २०२० वर्षांत हा आकडा ५४१ वर पोहोचला.

मुंबई-आग्रा या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊन नऊ वर्षांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे.

एकेरी मार्गावरील वाहतूक असुरक्षित होती. अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. सुरक्षित आणि वेगवान वाहतुकीसाठी महामार्गाचे चौपदरीकरण झाले. पण रस्ते अपघात, अपघाती मृत्यूंची संख्या कमी झाली नाही. नागपूर-सूरत महामार्ग तर ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ सारखा आहे. महामार्गाचे अपूर्ण काम अपघाताना निमंत्रण देणारा ठरतो. निर्बंध शिथिल झाल्यावर राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील मजूर याच महामार्गाने परतीच्या प्रवासाला आपल्या घराकडे निघाले होते. पायी प्रवास करणाऱ्या काही मजुरांना अपघातात प्राण गमवावे लागले. जिल्ह्य़ातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा आणि नागपूर-सूरत या राष्ट्रीय महामार्गासह अन्य राज्य आणि उपमार्गावर अधिकाधिक अपघात झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वारंवार अपघात होणारी ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) शोधून उपाययोजना केल्या जातात. महामार्गावरील वाढत्या अपघातांनी तसे काही उपाय झाले की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. टाळेबंदी असूनही अपघातांची संख्या वाढल्याने ते रोखण्यासाठी विशेष उपाययोजना हाती घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

जिल्ह्य़ातील राष्ट्रीय महामार्गावरच अपघातात अधिक बळी गेले आहेत. एकूण अपघातांपैकी निम्म्याहून अधिक अपघात हे राष्ट्रीय महामार्गावर झाल्याचे आकडेवारीवरून दिसते. वाहनधारकांनी वाहतूक नियम काटेकोरपणे पाळायला हवेत. वेगावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.

– प्रशांत बच्छाव (अपर पोलीस अधीक्षक, धुळे )

जिल्ह्य़ातील वाढत्या अपघातांची संख्या आणि त्यात मृत पावणारे तसेच कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांचे प्रमाण कमी झाले असा दावा करणाऱ्यांच्या डोळ्यात समोर आलेली आकडेवारी अंजन घालणारी आहे. या गंभीर बाबीवर प्रशासने तेवढय़ाच गंभीरतेने काम करणे आवश्यक आहे. यासाठी सामाजिक संघटना सातत्याने पाठपुरावा करीत आहे.

– डॉ. योगेश सूर्यवंशी (प्रवासी संघटनेचे सदस्य)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Increase in highway accidents even in years of lockout abn

ताज्या बातम्या