सातारा : गणेशोत्सवापूर्वी चाळिस रुपये किलो असा दर असलेल्या झेंडूने गणेशोत्सवात मात्र घाऊक बाजारात शंभरी गाठली आहे. उत्सवात दर फुलल्यामुळे झेंडू उत्पादकांना गणराय पावला आहे. वाढीव दरामुळे त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे. ‘गोल्डन यलो’ आणि ‘गोल्डन ऑरेंज’ जातीची झेंडूची फुले ही किरकोळ बाजारात गणेशोत्सवात ३०० रुपये किलो दराने विकली गेली.गणेशोत्सवापूर्वी बाजारात झेंडूच्या फुलाचे दर पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता दिसून येत होती. यंदा सतत पाऊस असल्याने झेंडूची लागवड कमी झाली आहे. शिवाय ज्यांनी लागवड केली त्यांचा उगवलेला झेंडूदेखील सततच्या पावसामुळे खराब झाला आहे. दुसरीकडे ढगाळ वातावरणामुळे यंदा झेंडूवर रोगाचा प्रादुर्भावदेखील अधिक प्रमाणात आहे.

दरम्यान ज्या भागात पाऊस कमी झाला त्या ठिकाणी झेंडुचे उत्पादन चांदले आले. या शेतकऱ्यांचा माल सध्या बाजारात येत आहे. सध्या बाजारात लाल पिवळ्या रंगांची झेंडूची फुले आहेत. यामध्ये लाल -केशरी रंगात ऑरेंज, कलकत्ता, जंबो आदी जाती आहेत; तसेच पिवळ्या रंगात ‘स्मार्ट यलो’, कांचन, श्रावणी जातीची फुले विक्रीसाठी आली आहेत. पिवळ्या झेंडूचा दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. मागणी अधिक असल्याने केशरी रंगाच्या झेंडूचा दर किलोला शंभरी पार करत सव्वाशे झाला आहे. शेवंतीच्या फुलाचीसुद्धा आवक आहे. शेवंतीचा दर सध्या दीडशे ते दोनशे रुपयापर्यंत आहे. घाऊक बाजारात पुणे मुंबई येथे सातारा, सांगली येथून जास्त आवक आहे. यंदा महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण जास्त असल्याने फूलबागांचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत कर्नाटकमधील बंगळुरूला जेमतेम पाऊस असल्याने बागा वाचल्या आहेत. पुण्या-मुंबईच्या फुलांच्या घाऊक बाजारात बंगळुरूची फुले सध्या मोठ्या प्रमाणात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. स्थानिक फुलांच्या दराला परप्रांतांतील फुलांची स्पर्धा करावी लागत आहे. जिल्ह्यात सातारा, वाई, खटाव, माण, फलटण, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कराड तालुक्यांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूची लागवड करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु पाणी साचणाऱ्या शेतामध्ये यंदा सततच्या पावसाने उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाने उघडीप दिल्याने दसरा, दिवाळी डोळ्यासमोर ठेवून शेतकरी झेंडूची चांगलीच काळजी घेत आहेत. दर मिळण्याच्या आशेने काही नव्याने लागवड करण्याच्या तयारीत आहेत.

हेही वाचा >>>Nitin Gadkari : “तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आमचा पाठिंबा, त्या नेत्याने..”, नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत

कृत्रिम फुलांची स्पर्धा

सणासुदीच्या दिवसांत देवाला हार आणि सजावटीसाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो. उत्सव काळात वाढणारे दर यामुळे अलीकडे काही लोक प्लॅस्टिकच्या कृत्रिम फुलांचे हार, माळा याचा अधिक वापर करतात. जास्त दिवस टिकत असल्याने लोकांचा त्यांकडे कल वाढला आहे. सध्या बाजारात रंगीबेरंगी कृत्रिम फुलांची रेलचेल आहे. त्यांनी खऱ्या फुलांपुढे स्पर्धा निर्माण केली आहे.

केशरी झेंडूला अधिक दर

पाऊस जास्त झाल्यामुळे दादर फूल मार्केटमध्ये मालाची आवक कमी आहे. रोगाचा प्रादुर्भाव असल्याने चांगल्या दर्जाची फुले येत नाहीत. चांगल्या दर्जाच्या झेंडूला दर देखील चांगला आहे. महाराष्ट्रापेक्षा बंगळुरूहून अधिक माल बाजारात येत आहे. सध्या झेंडूच्या पिवळ्या वाणापेक्षा केशरी वाणाला अधिक दर आहे. दसरा-दिवाळीलादेखील दर टिकून राहतील अशी शक्यता आहे.- रमेश शिंदे, फूल व्यापारी, मीनाताई ठाकरे फूल मार्केट, दादर