एजाज हुसेन मुजावर 

अठरापगड जाती-धर्माच्या, गरीब श्रमिकांच्या, झोपडपट्टय़ा, चाळींनी वेढलेल्या सोलापुरात करोना विषाणूचा कहर दिवसागणिक वाढत चालला आहे. सोलापुरात ५२ दिवसांत करोनाबाधित रुग्णांची संख्या एक हजाराचा टप्पा पूर्ण करीत १०८० पर्यंत गेली असताना मृतांचा आकडाही शंभरी गाठण्याच्या बेतात आहे. मागील आठवडाभरात रुग्णांची व मृतांची संख्या अधिकच झपाटय़ाने वाढत असून हा वेग कमी न होता आणखी किती वाढेल, याची सर्वाना चिंता लागली आहे. करोनाचा विषाणू आता शहरातील पूर्व आणि दक्षिण भागानंतर उत्तर आणि पश्चिमेसह संपूर्ण गावठाण भागात तसेच ग्रामीण भागात फैलावत आहे.

देशात टाळेबंदी सुरू झाल्यानंतर पहिल्या २० दिवसांपर्यंत करोनाचा शिरकाव न झाल्याने सोलापूरकर निश्चिंत होते. पूर्व भागापासून सुरुवात झालेला करोनाचा कहर थोडय़ाच दिवसांत दक्षिण भागातही पोहोचला. हा साराच भाग दाटीवाटीच्या झोपडपट्टय़ांनी वेढलेला. विडी, यंत्रमाग आणि कापड उद्योगातील गरीब कामगारांच्या वसाहती असलेल्या या भागात मुळात गरिबी, अज्ञान, दारू-शिंदीची व्यसनाधीनता, आरोग्याविषयीची अनास्था, गुन्हेगारी या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या. करोनाचा सर्वाधिक फटका प्रामुख्याने याच भागाला बसत आहे. आतापर्यंत एकटय़ा पूर्व भागातच एकूण रुग्णांच्या निम्मे म्हणजे सुमारे पाचशे रुग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या तेवढीच जास्त आहे.

आरोग्य यंत्रणेवर ताण

करोनाचे संकट ओढवले तसा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयावरील वैद्यकीय सेवेचा भार वाढला आहे. सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात काही रुग्ण करोनाबाधित आढळून आल्याने गोंधळ उडाला. खासगी रुग्णालयांमध्ये तापाचे रुग्ण दाखल करून घेण्यात आले नाहीत. त्यामुळे शासकीय रुग्णसेवेवर जसा भार वाढत चालला, तशी तेथील अव्यवस्था, अपुरे मनुष्यबळ आणि सुविधांचा अभाव यामुळे तेथील यंत्रणा तोकडी पडू लागली. यातच आजार अंगावर काढणाऱ्या वृद्धांकडे घरातील तरुणांनी केलेले दुर्लक्ष ही बाबदेखील अधोरेखित करावी लागेल. बरेच रुग्ण खूप उशिरा रुग्णालयात दाखल झाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. तर अनेक व्यक्ती वैद्यकीय उपचाराअभावी घरातच दगावल्याचे चित्र दिसून आले.

आयुक्त बदलून काय साधणार?

करोनाशी दोन हात करताना प्रशासनाचे मनोबल कमी न होता ते उंचावेल, हे पाहणे गरजेचे आहे. करोना आणि टाळेबंदी यामुळे भयभीत झालेल्या आणि हातावर पोट असलेल्या बहुसंख्य गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही तेवढीच महत्त्वाची आहे. परंतु येथे राजकीय पुढारी, आमदार, खासदारांनी या भयसंकटात निभावलेली भूमिका निराशाजनक म्हणावी लागेल. यातच अशा कठीण संकटातच सोलापूरला तीन पालकमंत्री बदलले गेले आहेत. या परिस्थितीत अपयशाचे खापर एकटय़ा प्रशासनावर फोडण्यात अर्थ नाही. पालिका आयुक्त दीपक तावरे यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीने काय साधले, हा संशोधनाचा विषय ठरावा. खरे तर प्रशासनाचे दुखणे काय, हेदेखील पाहिले पाहिजे. वाढती रुग्णसंख्या आणि मृतांचे वाढते चिंताजनक प्रमाण पाहता रुग्णसेवा सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र आयएएस अधिकारी नियुक्त करता येईल का, याचाही विचार होणे अपेक्षित होते.

याउपर टाळेबंदी शिथिल होत असली तरी त्याचा लाभ शहरातील बहुतांशी प्रतिबंधित क्षेत्रांत असलेले यंत्रमाग, विडी व गारमेंट उद्योग सुरू होण्यासाठी मिळण्यात अडचणी येतात. त्यातून मार्ग कसा काढला जातो, याचीही सार्वत्रिक उत्सुकता आहे. एरवी, गेल्या दहा वर्षांपासून सोलापूरला कोणी राजकीय वाली राहिला नाहीय. सध्याच्या करोना भयसंकटात सोलापूरचे हे दुखणे प्रकर्षांने जाणवतेय.

‘सारी’ने ३५ जण दगावले

करोना भयसंकट सुरू झाल्यापाठोपाठ ‘सारी’ची साथही झपाटय़ाने पसरली आहे. आतापर्यंत करोनामुळे झालेल्या ९० मृत्यूंपैकी जवळपास ३५ मृत्यू ‘सारी’मुळे झाल्याची नोंद आहे. पाच्छा पेठ, शास्त्रीनगर, बापूजीनगर, नीलमनगर, आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्ती, भारतरत्न इंदिरानगर, कुमठा नाका, मोदीखाना, बुधवार पेठ आदी १५ पेक्षा अधिक भाग अतिधोकादायक ठरले आहेत. आजमितील सुमारे १५० प्रतिबंधित क्षेत्रांत करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न होत असले तरी आव्हान वरचेवर वाढतच आहे.