महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी सार्वजनिक बांधकाममंत्री यांच्यासमवेत गुन्हा दाखल झालेले माहिती आयुक्त दीपक देशपांडे यांच्या घबाडात आणखी दीड किलो सोन्याची वाढ झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी औरंगाबाद शहरातील बँक ऑफ पटियालाच्या भाग्यनगर शाखेतील दोन लॉकरची झडती सोमवारी घेतल्यानंतर आणखी दीड किलो सोने त्यांच्याकडे आढळून आले.
दरम्यान, माहिती आयुक्त देशपांडे यांना त्यांच्या पदावरून हटविले आहे की नाही किंवा त्यांना निलंबित केले आहे की नाही, याची कसलीही माहिती राज्य माहिती आयोगाच्या कार्यालयात दिली गेलेली नव्हती. या अनुषंगाने कसलाही पत्रव्यवहार माझ्यापर्यंत पोहोचला नाही, असे माहिती आयोगाचे उपसचिव द. रा. कहार यांनी सांगितले. दरम्यान, देशपांडे यांच्यावर प्रशासकीय कारवाईसाठी मंत्रिमंडळाच्या शिफारशीसह तसा अहवाल राज्यपालांकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतरच त्यांच्यावर कारवाई होऊ शकेल, असे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. आयोगाच्या स्थापनेच्या वेळी कलम १७ प्रमाणे नियुक्ती व कारवाईचे अधिकार राज्यपालांना आहेत, असेही गायकवाड म्हणाले.
औरंगाबादच्या माहिती आयोगाच्या कार्यालयात सोमवारी सर्वसाधारणपणे सुनावणी होत नाही. सोमवार आणि शनिवार अशी कारवाई केली जात नाही. आलेल्या तक्रारींची दखल आयुक्त या दिवशी घेत असतात. गेल्या वर्षभरात माहिती आयुक्तालयात द्वितीय अपिलाची १२२७ प्रकरणे तर ३२४ तक्रारीही प्रलंबित होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागातून निवृत्त झाल्यानंतर औरंगाबाद येथे माहिती आयुक्त म्हणून नियुक्त झालेले देशपांडे हे दुसरे अधिकारी आहेत.
माहिती आयोगाच्या कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागातील किती अपिले प्रलंबित आहेत अथवा किती निकाली काढली, याबाबतची स्वतंत्र माहिती उपलब्ध नाही. अशी विभागनिहाय माहिती ठेवत नसल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले.
सोमवारी दिवसभर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा झडतीची प्रक्रिया चालू ठेवली. लॉकर उघडल्यानंतर आणखी दीड किलो सोन्याचे दागिने आढळून आले. मुंबई येथील बँकेतही आणखी दोन लॉकर असल्याने त्यांचे वाढलेले एकूण घबाड नक्की किती, हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू असणाऱ्या झडतीत आतापर्यंत त्यांच्याकडे आतापर्यंत त्यांच्याकडे तीन किलो सोने असल्याचे स्पष्ट झाले आहे.