महिला सबलीकरणाची कितीही धोरणे असली, तरी महिलांच्या कौटुंबिक छळाचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. दिवसेंदिवस कौटुंबिक छळाच्या घटना वाढतच आहेत. जिल्ह्यातील तीन पोलीस ठाण्यांत एकाच दिवशी चार विवाहितांनी आपल्या सासरच्या मंडळींविरुद्ध छळाच्या तक्रारी दिल्या. माहेराहून पसे घेऊन ये, हेच कारण या चौघींच्याही छळामागे आहे.
अनेक घरांत विवाहित महिलांचा पशासाठी छळ केला जातो. दिसायला चांगली नाही किंवा लग्नात मानपान दिला नाही, तसेच माहेराहून पसे घेऊन ये, या साठी विवाहितांना शारीरिक-मानसिक त्रास दिला जातो. यातील अनेक महिला हा त्रास निमूटपणे सहन करतात. काही महिला पोलिसांची मदत घेतात. बुधवारी पाथरी, चुडावा येथे प्रत्येकी एक, तर चारठाणा पोलीस ठाण्यात दोन महिलांनी तक्रार दिली.
शिवनगाव (तालुका घनसावंगी) येथील लता विष्णू मोरे या महिलेचे माहेर पाथरी तालुक्यातील मंजरथा असून तिने पाथरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. लग्नानंतर तीन वर्षांनी जीप घेण्यासाठी माहेराहून एक लाख रुपये आण, अशी मागणी करीत सासरच्या मंडळींनी छळ सुरू केल्याचे तिने म्हटले. ही मागणी पूर्ण न केल्याने पती विष्णू याने अर्चना नामक युवतीशी दुसरा विवाह केला. या प्रकरणी विष्णू वैजनाथ मोरे, सासरा वैजनाथ मोरे, सासू द्वारका मोरे, दीर सुनील, संतोष व सवत अर्चना, नणंद मीरा मगरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
बोरकिन्ही (जांभरुन, तालुका जिंतूर) येथील अनिता मंगेश चाटे या विवाहितेच्या तक्रारीवरून मंगेश चाटे, नणंद द्वारका संतोष घोळवे, राधा डाककर, नंदई बाळू डाककर (सर्व बोरकिन्ही) यांच्याविरुद्ध चारठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. लग्नाच्या ४ वर्षांनंतर सासरच्यांनी अनिताकडे टेम्पो घेण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी केली. तिला उपाशी ठेवून मारहाण करीत घराबाहेर हाकलून दिले. याच पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार सुरेखा बळीराम गव्हाणे (गणेशपूर, नव्हाती तांडा, जिंतूर) हिने दिली. दिसायला चांगली नाही, स्वयंपाक येत नाही तसेच माहेराहून ऑटो घेण्यासाठी ५० हजार रुपये आणावेत, या साठी लग्नाच्या ४ वर्षांनंतर सुरेखाला सासरच्यांनी त्रास देणे सुरू केले. पती बळीराम भीमराव गव्हाणे, मामेसासू कलाबाई किशन नवघरे, किशन विठ्ठल नवघरे, शाहूबाई नवघरे, विठ्ठल नवघरे, गावचा पोलीस पाटील अर्जुन वाणी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. चौथी तक्रार चुडावा पोलीस ठाण्यात दाखल झाली. शिरडशहापूर (औंढा) येथील मंगल बाळू गायकवाड हिच्या तक्रारीवरून बाळू रमेश गायकवाड, गोदावरी रमेश गायकवाड, सतीश गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला.