सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार माथेरान मध्ये प्रायोगिक तत्वावर ई रिक्षा चाचणीला सुरवात झाली आहे. या ई रिक्षाला प्रवाश्यांकडून वाढता प्रतिसाद मिळत आहे. दिड महिन्यात तब्बल ३२ हजार प्रवाश्यांना ई रिक्षा सेवेचा लाभ मिळाला असून, यात चार हजार शालेय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा- ‘५० खोके.. घोषणा काश्मीरमध्ये पोहोचली’, उद्धव ठाकरे म्हणाले, “निष्ठेच्या पंघरुणाखाली लांडगे…”




ब्रिटीश काळापासून माथेरान मध्ये वाहन बंदी अस्तित्वात आहे. पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याचे कारण पुढे करून ही वाहन बंदी आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे घोडे आणि मानवाकडून ओढल्या जाणाऱ्या हात रिक्षा यासारख्या मध्यमयुगीन वाहतुक साधनांचा आजही माथेरान मध्ये वापर होत आहे. ब्रिटीश काळात हात रिक्षा या गुलामगिरीचे प्रतिक म्हणून ओळखल्या जायच्या. त्यामुळे स्वातंत्रप्राप्तीनंतर हळुहळू देशभरातील हातरिक्षा बंद करण्यात आल्या. माथेरान मध्ये मात्र ही प्रथा सुरुच राहिली.
हेही वाचा- उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त जिल्ह्यातील ठाकरे गटाचे पदाधिकारी ठाण्यात, पक्षीय ताकद दाखविणार
शासनस्तरावर पाठपुरावा करून ही हातरिक्षांची प्रथा बंद होत नसल्याने माथेरान मधील सुनील शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यसरकारची कानउघाडणी करत माथेरान मध्ये तीन महिने ई रिक्षा चाचणी सुरु करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. यानुसार आता माथेरान मध्ये पाच ई रिक्षा सुरु करण्यात आल्या आहेत. या ई रिक्षांना प्रवाश्यांचा चांगला प्रतिसाद लाभतो आहे. पहिल्या दिड महिन्यात तब्बल ३२ हजार ६६५ प्रवाश्यांनी ई रिक्षा सेवेचा लाभ घेतला आहे. यात ४ हजार ४ हजार ४१९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
ई रिक्षासेवेसाठी विद्यार्थ्यांकडून पाच रुपये तर इतर प्रवाश्यांकडून ३५ रुपये इतका दर आकारला जातो आहे. घोडे आणि हातरिक्षांच्या तुलनेत हा दर कितीतरी कमी आहे. त्यामुळे प्रवाशीही खुष आहेत. टाटा सोशल सायन्स च्या वतीने ई रिक्षाचे फायदे आणि तोटे यांचा नुकताच अभ्यास करण्यात आला.यावेळी प्रा. अनिता भिडे आणि प्रा. सुहास भिडे उपस्थित होते. त्यांनी नागरीकांशी संवाद साधत ई रिक्षाबाबत त्यांची मते जाणून घेतली. नागरीकांनीही आपली मते उत्फुर्तपणे मांडली. न्यायालयाच्या निर्देशानुसार पुढील दीड महिना ही ई रिक्षा सेवा प्रायोगिक तत्वावर सुरु राहणार आहे. त्यानंतर न्यायालयात या चाचणीचा सविस्तर अहवाल सादर केला जाणार आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार ई रिक्षांच्या प्रायोगिक चाचणीला सुरवात झाली आहे. पहिल्या दिड महिन्यात प्रवाश्यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे.