पुण्याच्या इंदापूर तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आईच्या नावावर असलेली जमीन का विकली, या कारणावरून दोन मुलांनी मिळून आपल्या ६५ वर्षीय वृद्ध शेतकरी वडिलांना आणि आजारी आईला रस्त्यात अडवून काठ्यांनी निर्दयपणे मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या वृत्तसंस्थेने दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास तुकाराम किसन राऊत (वय ६५) आणि त्यांची आजारी पत्नी अंजना राऊत हे आपल्या गावात नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले, संजय राऊत आणि राजेंद्र राऊत यांनी गाडीतून त्यांचा पाठलाग केला.
रस्त्यातच गाडी थांबवून मुलांनी वडिलांना ‘जमीन का विकली?’ असा सवाल करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जमिनीचा व्यवहार तात्काळ रद्द न केल्यास जीवे मारण्याची धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर दोन्ही मुलांनी हातातील लाकडी काठ्यांनी आई-वडिलांवर हल्ला चढवला.
आई-वडिलांवर थेट काठ्यांनी हल्ला
मुलांच्या या प्राणघातक हल्ल्यात तुकाराम राऊत यांच्या पाठीवर, चेहऱ्यावर, मांडीवर आणि डाव्या खांद्यावर गंभीर दुखापत झाली आहे. तर मध्ये पडलेल्या वृद्ध आणि आजारी आई अंजना यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर आणि कमरेवर काठीने जोरदार प्रहार करण्यात आले. “विकलेली जमीन ताबडतोब परत घ्या, नाहीतर आम्ही काय करू शकतो हे दाखवून देऊ,” अशी धमकी देत मुलांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल
रस्त्यावर सुरू असलेला हा प्रकार पाहून स्थानिक नागरिक मदतीसाठी धावून आले आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमी वृद्ध दांपत्याला तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तुकाराम राऊत यांच्या तक्रारीवरून इंदापूर पोलीस ठाण्यात संजय राऊत आणि राजेंद्र राऊत या दोन्ही भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन्ही मुले इंदापूरमधील माळवाडी नंबर २ येथे आपल्या कुटुंबासह वेगळी राहतात. धोकादायक शस्त्रांनी मारहाण करणे, शांततेचा भंग करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे या कलमांखाली पोलीस पुढील कारवाई करत आहेत.
