रत्नागिरी – कोकणातील पर्यावरण आणि नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाविरोधातील जनआक्रोश तीव्र होत आहे. प्रदूषणकारी रासायनिक कंपन्यांविरोधात पुकारलेले बेमुदत आंदोलन सलग तिसऱ्या दिवशीही सुरू असून, “कर्करोगाच्या विळख्यातून वाचवा” अशी आर्त मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे. ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार शेतकरी, बागायतदार आणि पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.

ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र आंब्रे यांनी आंदोलनस्थळी बोलताना, लोटे एमआयडीसीमधील प्रदूषणाचे गंभीर वास्तव मांडले. गेल्या साडेतीन दशकांपासून औद्योगिक कंपन्यांकडून हवेत विषारी वायू सोडले जात असून, सांडपाण्याच्या अपुऱ्या व्यवस्थापनामुळे भूजलसाठेही दूषित झाल्याचा आरोप त्यांनी केला. विशेषतः रात्रीच्या वेळी सोडल्या जाणाऱ्या उग्र वायूंमुळे नागरिकांना श्वसनास त्रास होत असून, परिसरात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी नमूद केले. हा विकास नसून स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळ असल्याचे सांगत, आरोग्यावर बेतणारा कोणताही रोजगार स्वीकारार्ह नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.

शेतकरी कष्टकरी कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्यांवर तातडीने बंदी घालावी, दोषी कारखानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, तसेच लोटे परिसरातील नागरिकांची सर्वंकष आरोग्य तपासणी तात्काळ करावी, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत.

लोटे औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषणाचा प्रश्न आता राज्यपातळीवर लक्ष वेधून घेत असून, या गंभीर विषयावर शासनाच्या ठोस भुमिकेकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.