प्रबोध देशपांडे
अकोला : राज्यसभा निवडणुकीत दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना यापुढे निधी देताना विचार करावा लागेल, असे सूचक विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज केले.बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘राज्यसभा निवडणुकीत काही अपक्ष आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला दगा दिला. आतापर्यंत विकास निधी देताना अपक्ष आमदारांना झुकते माप देण्यात येत होते. त्यांच्या मतदारसंघात आमच्या बरोबरीने विकास कामे करवून घेतली. निवडणुकीत मात्र काही अपक्ष आमदारांनी दगाफटका केला. त्यामुळे यापुढे त्यांना निधी देताना विचार केला जाईल.

देशात ६० टक्के ओबीसी समाज आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही. काही झाले तरी ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवून दिल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही, असे देखील ते म्हणाले.
स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसींना बळ देण्याचे काम केले. मात्र, आता त्यांच्या कुटुंबीयांना वाईट वागणूक दिली जात आहे. ओबीसींचे नेतृत्व संपविण्याचा डाव रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.