सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने कोणत्याही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. जर युतीच्या अधिकृत उमेदवारांचा पराभव करून कोणी अपक्ष निवडून आला, तर त्या क्षेत्रात पुढील पाच वर्षे विकासनिधी दिला जाणार नाही, असा थेट इशारा पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली येथील ‘ओम गणेश’ निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मंत्री नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यात खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर किंवा मी स्वतः कोणत्याही बंडखोर किंवा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिलेला नाही. काही अपक्ष उमेदवार मतदारांमध्ये संभ्रम पसरवत आहेत. मात्र, मतदारांनी हे लक्षात ठेवावे की, कमळ आणि धनुष्यबाण या चिन्हांव्यतिरिक्त अन्य कोणी निवडून आले, तर त्यांना विकासकामांसाठी निधी आणणे कठीण होईल. सत्ताधारी महायुतीचे उमेदवार निवडून आले तरच जिल्ह्याचा विकास वेगाने होईल.

शिवसेना (उबाठा) गटावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, जिल्ह्यात ठाकरे सेनेने मतदारांचा पूर्ण विश्वास गमावला आहे. त्यांचा ना आमदार आहे, ना खासदार. वरिष्ठ नेतेही जिल्ह्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे कार्यकर्ते निवडणूक लढवायला तयार नाहीत. याच कारणामुळे महायुतीचे २५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आम्ही विरोधात होतो, तरीही जनतेचा आमच्यावर विश्वास होता. मात्र, आज ठाकरे सेनेच्या उमेदवारांना निवडून आल्यावर निधी मिळेल की नाही, याची धास्ती वाटत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांमधील बंडखोरी मोडीत काढण्यात महायुतीला यश आले आहे. अर्ज माघारीसाठी अधिक वेळ मिळाला असता, तर एकही बंडखोर रिंगणात दिसला नसता. सध्या महायुतीसाठी जिल्ह्यात अत्यंत पोषक वातावरण असून आम्ही पूर्णपणे ‘टेन्शन फ्री’ आहोत, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.