“करोना व्हायरसचं संकट संपल्यानंतर आपल्याला आर्थिक आघाडीवर मोठी लढाई लढावी लागेल. करोना व्हायरसमुळे चीनबद्दल निर्माण झालेल्या वातावरणात आपल्याला आपत्तीला इष्टापत्ती बदलण्याची संधी आहे” असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

“अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि जपान या देशांना कुठल्याही परिस्थितीत चीनमधून आयात करायची नाहीय. या परिस्थितीत भारताला चांगली संधी आहे. हाँगकाँग, फिलीपाइन्स या देशांमध्ये ही गुंतवणूक न जाता एमएसईबीच्या माध्यमातून ही भांडवली गुंतवणूक भारतात आली पाहिजे. आपली आयात कमी होऊ निर्यात वाढली तर रोजगाराच्या संधी वाढतील” असे गडकरी म्हणाले.

‘ग्रामीण, कृषी, वनवासी क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगार निर्मिती झाली पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकरी आणि त्यांची मुल समृद्ध झाली पाहिजेत’ असे गडकरी म्हणाले. “कोणकोणत्या क्षेत्रात आपण जास्त आयात करतोय ती क्षेत्र आम्ही हेरली आहेत. तिथे निर्यात वाढवण्याचा प्रयत्न आहे. लोक पुन्हा शहरातून गावाकडे गेले पाहिजेत तशा पद्धतीचा विकास झाला पाहिजे” असे गडकरी म्हणाले.