India Skills Report 2026 Reveals Top Youth Employability: शिक्षण आणि रोजगाराचा प्रश्न सध्या देशभरात पेटला आहे. शिक्षण व्यवस्थेतील कमतरतेविरोधात विद्यार्थी आंदोलन करत आहेत. तर युवक रोजगार नसल्यामुळे या आंदोलनांना पाठिंबा देऊन आपलीही नाराजी व्यक्त करत आहेत. या दरम्यान सर्वाधिक रोजगार देणाऱ्या राज्याच्या यादीत उत्तर प्रदेशचा सर्वात वरचा क्रमांक लागत असल्याची माहिती समोर आली आहे. ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६’ या अहवालामध्ये दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश सर्वाधिक रोजगारक्षम राज्य ठरले आहे. त्यानंतर महाराष्ट्र आणि कर्नाटक यांचा क्रमांक लागतो.
याशिवाय केरळ आणि दिल्ली या राज्यांचाही पहिल्या पाच राज्यांच्या यादीत समावेश आहे. ‘इंडिया स्किल रिपोर्ट २०२६’ अवहालानुसार भारताची एकूण सरासरी रोजगारक्षमता ५६.३५ टक्के इतकी आहे. २०२५ मध्ये ही संख्या ५४.८१ टक्के इतकी होती. हा अहवाल ‘ग्लोबल एम्प्लॉयबिलिटी टेस्ट’ दिलेल्या १ लाखाहून अधिक उमेदवारांच्या माहितीवर, तसेच सात उद्योग क्षेत्रांच्या प्रतिसादांवर आधारित आहे. या माहितीतून नोकरीचे बदलते बाजारक्षेत्र जसे की, एआय, डिजिटिल स्किल, गिग कामे आणि घरून काम करण्याचे रोजगार वाढत असल्याचे दिसले.
उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक रोजगारक्षमता
इंडिया स्किल रिपोर्ट २०२६ अहवालातील माहितीनुसार, उत्तर प्रदेश युवकांसाठी सर्वाधिक रोजगारक्षम राज्य असल्याचे समोर आले आहे. या राज्यातील रोजगारक्षमतेची टक्केवारी ७८.६४ टक्के इतकी आहे. त्याखालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राची रोजगारक्षमता ७५.४२ टक्के, कर्नाटक ७३.८५ टक्के, केरळ ७२.१६ टक्के आणि त्यानंतर दिल्ली ७१.२५ टक्के इतकी रोजगारक्षमता आहे.
सदर क्रमवारी राज्यातील उपलब्ध नोकऱ्यांची संख्या मोजण्याऐवजी तरुण उमेदवारांच्या नोकरीसाठीची तयारी किती, हे दर्शवते. त्यामुळे एखादे राज्य प्रथम स्थानी आहे, याचा अर्थ त्या राज्यात सर्वाधिक नोकऱ्या आहेत, असे होत नाही. या अहवालानुसार या राज्यातील तरुणांची रोजगारक्षमता अधिक असल्याचे दिसते.
२२ ते २५ वयोगटात तरुणांमध्ये सर्वाधिक ७५.७ टक्के इतकी रोजगारक्षमता नोंदवली गेली आहे. त्याखालोखाल २६-२९ वयोगटातील तरुणांमध्ये ७१.७९ टक्के आणि १८-२१ वयोगटातील तरुणांमध्ये ७१.३८ टक्के रोजगारक्षमता आहे.
संगणक विज्ञान आणि आयटी पदवीधरांना अधिक मागणी
तंत्रज्ञान आधारित शिक्षण घेतलेल्या तरुणांना सर्वाधिक मागणी असल्याचे अहवालातून कळते. संगणक विज्ञानातून पदवीधर झालेल्या तरुणांमध्ये ८० टक्के रोजगारक्षमता आहे. त्याखालोखाल माहिती तंत्रज्ञान ७८ टक्के, इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी ७७ टक्के, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी ७५ टक्के आणि मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये ६३ टक्के रोजगारक्षमता नोंदवली गेली आहे.
एआय, डेटा ॲनालिटिक्स, क्लाउड कम्प्युटिंग आणि सायबरसुरक्षेचे ज्ञान असणाऱ्या तरुणांनाही अधिक मागणी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
