Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामरा हा नेहमीच त्याच्या वक्तव्यांमुळे किंवा सामाजिक माध्यमांवरील कृतीमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी कुणाल कामराने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गीत सादर केलं होतं. त्या प्रकरणात आता कुणाल कामरा हक्कभंगाच्या कारवाईला सामोरं जात आहेत.
या पार्श्वभूमीवरच विधीमंडळाच्या विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामराची साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे यांच्यावरील गीत हा व्यवसायाचा भाग असल्याचं कुणाल कामराने म्हटलं आहे. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर गाण्याच्या माध्यमातून केलेल्या ‘गद्दार’ टीकेबद्दल माफी मागण्यास कुणाल कामराने नकार दिला आहे. तसेच साक्षीवेळी कुणाल कामराने आपण कोणतीही चूक केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र विधान परिषदेच्या विशेषाधिकार समितीसमोर कुणाल कामरा तिसऱ्यांदा हजर झाला होता. यावेळी झालेल्या सुनावणीदरम्यान विशेषाधिकार समितीने कुणाल कामराला कथित अपमानजनक टिप्पणीबद्दल अनेक वेगवेगळे प्रश्न विचारले. या प्रश्नांत कुणाल कामराला आपल्या कृतीचा पश्चात्ताप होतो का? त्याबाबत माफी मागायची आहे का? अशा प्रश्नांचा समावेश होता.
Maharashtra ❤️❤️❤️ pic.twitter.com/FYaL8tnT1R
— Kunal Kamra (@kunalkamra88) March 23, 2025
सुनावणीला उपस्थित असलेल्या समिती सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कुणाल कामराने माफी न मागण्याची ठाम भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. तसेच उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील गाण्यात केलेल्या गद्दार अशा उल्लेखाच्या आरोपावर आपण किलामार्फत उत्तर देऊ असं सांगितलं असल्याची माहिती हिंदुस्तान टाइम्सने एका वृत्तात दिली आहे. दरम्यान, आता कामराने माफी मागण्याबाबतची आपली भूमिका लेखी स्वरूपात सादर केल्यानंतर त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या विशेषाधिकार भंगाच्या नोटीसवर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
