Tukaram Mundhe FDA : गेल्या काही दिवसांपासून अन्न व औषध प्रशासन विभागाकडून भेसळखोरांवर होत असलेल्या कारवायांची मोठी चर्चा सुरू आहे. तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून राज्यभरात अनेक ठिकाणी भेसळखोरांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तुकाराम मुंढे यांची देखील मोठी चर्चा सुरू आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाकडून राज्यात भेसळखोरांवर करण्यात येत असलेल्या कारवायांबाबत आता तुकाराम मुंढे यांनी भूमिका मांडली आहे. यावेळी बोलताना तुकाराम मुंढे यांना काही वर्षांपूर्वी आलेला एक धक्कादायक अनुभव देखील सांगितला आहे. तसेच जी गोष्ट खायला आवडते त्यावर कधी कारवाई केली का? यावरही तुकाराम मुंढे यांनी भाष्य केलं आहे.
तुकाराम मुंढे काय म्हणाले?
तुम्हाला खायला एखादा पदार्थ आवडतो, पण तो मिळणाऱ्या हॉटेलवरही कधी कारवाई करण्याची वेळ आली का? असं कधी घडलं का? यावर बोलताना तुकाराम मुंढे म्हणाले की, “मी बाहेर खाण्यासाठी तसंही जात नाही. जेव्हापासून मी प्रशासकीय सेवेत आलो तेव्हापासून असं कधीही घडलं नाही. मात्र, जेवढ्या हॉटेल्स आणि अस्थापनांवर कारवाया केल्या किंवा काही क्लबवर कारवाया केल्या, त्यातील एका क्लबचा मेंबर मी देखील आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत बोलताना सांगितलं.
‘तेव्हा मला धक्काच बसला’, मुंढेंनी सांगितला धक्कादायक किस्सा
तुम्ही सरळ मार्गाने चालणार अशी भूमिका घेत असताना तुमच्या मार्गात अडथळा आणण्याचा प्रयत्न होतो का? तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न कधी झाला का? यावर बोलताना तुकाराम मुंढे यांनी सांगितलं की, “असा खूप त्रास होतो आणि मला सुरुवातीला खूप जास्त त्रास झाला. त्याबाबत मी पुस्तकात देखील शेवटी उल्लेख केला. माझं एक वर्षांचं प्रशिक्षण झाल्यानंतर सोलापूरला माझी प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. तेव्हा मी बार्शीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण विरोधी कारवाई केली होती. जवळपास १३०० ते १४०० अतिक्रमण काढले होते. तेव्हा दोन ते तीन महिला बुके घेऊन मला भेटण्यासाठी आल्या होत्या, त्यांना माझा सत्कार करायचा होता. त्यामुळे मी गार्डला सांगितलं की त्यांना पाठवा. तेव्हा मला त्या गार्डने सांगितलं की त्या महिलांना भेटायला पाठवणं योग्य नाही. मी गार्डला विचारलं की का? तर ते गार्ड बोलले की आम्हाला तशा सूचना आहेत. तेव्हा मला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सूचना होत्या की जर गार्डने सांगितलं की नाही जायचं तर नाहीच जायचं. त्यामुळे मी त्या महिलांना भेटलो नाही.”
“त्यानंतर २ तासांनी मला डीवायएसपींचा फोन आला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी काही लोक आले आहेत, ते तुमच्या म्हणजे माझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार करण्यासाठी काही महिला व वकील आले आहेत. तेव्हा मी विचारलं की तक्रार दाखल करण्याचं कारण काय? तेव्हा मला डीवायएसपींनी सांगितलं की सकाळी तुमचा सत्कार करण्यासाठी आलेल्या महिला तुमच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या आहेत. मी तेव्हा प्रशिक्षणार्थी होतो, तेव्हा मला पोलिसांनी असंही साांगितलं की त्या महिलांना तुमचा सत्कार करायचा होता आणि त्या दरम्यान स्वत:चे कपडे फाडून मग तुमच्या विरोधात तक्रार दाखल करायची होती. हे सगळं ऐकून मला धक्काच बसला होता”, असा धक्कादायक अनुभव आल्याचं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.
