Indian Sailors Rescued from Arabian Sea after Mumbai High Court intervention: भारतीय तटरक्षक दलाने तीन विदेशी जहाजांवर कारवाई केल्यानंतर त्यावरील ५० भारतीय खलाशी तीन महिन्यांपासून मुंबईनजीक समुद्रात अडकले होते. या खलाशांना अतिशय हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत होते. पाणी आणि अन्नावाचून त्यांची उपासमार होत होती. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने या खलाशांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून हे ५० खलाशी जहाजावरील अंधाऱ्या कप्प्यांमध्ये पुरेशा अन्न-पाण्याविना अडकून पडले होते. मात्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे त्यांना तीन महिन्यांनी जमिनीवर पाय ठेवता आला.

प्रकरण काय आहे?

मुंबईपासून ११ सागरी मैल अंतरावर अरबी समुद्रात अवैध इंधन तेल आणि डांबराची घेवाण-देवाण करत असताना तटरक्षक दलाने तीन जहाजे ताब्यात घेतली. एमटी अस्फाल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया या तीन जहाजांवरील ५० भारतीय खलाशांनाही जहाजावरच स्थानबद्ध करण्यात आले. फेब्रुवारीत ही स्थानबद्धता करण्यात आली. तेव्हापासून हे खलाशी अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जहाजावर राहत होते. अखेर यापैकी सात जणांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केल्यानंतर त्यांना दिलासा मिळाला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर यलो गेट पोलीस स्टेशनमधील औपचारिकता पूर्ण केल्यानंतर सर्व खलाशांची सुटका करण्यात आली. यानंतर सर्वांच्याच आनंदाला पारावर उरला नाही. काही जण अनेक दिवसांपासून उपाशी आणि तहानलेले असल्यामुळे त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवत होता. तर काही जणांनी त्यांच्या कुटुंबीयांना फोन करण्यासाठी धावाधाव केली.

indian-sailors-rescued-arabian-sea
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आनंदीत झालेले खलाशी. (Express photos by Akash Patil)

जहाजाचे मुख्य अधिकारी विपुल श्रीवास्तव यांनी सांगितले, आम्ही लागोपाठ तीन दिवस उपाशी होतो. या काळात एका मच्छिमाराने आमच्यावर दया दाखवून आम्हाला पाच-सहा किलो तांदूळ आणि डाळ दिली. पुढे जेवण कधी मिळेल, याची शाश्वती नसल्यामुळे आम्ही हा साठा आमच्या सहकाऱ्यांमध्ये पुरवून पुरवून वापरला.

९ फेब्रुवारी रोजी तीन जहाजांवर तटरक्षक दलाकडून कारवाई करण्यात आली. खलाशांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत आरोप केला की, या जहाजांचे मालक संयुक्त अरब अमिरातीमध्ये असून त्यांनी एप्रिल महिन्यापासून मदत देणे थांबवले आहे. मालक जोगेंद्र सिंग ब्रार यांनी तीन महिन्यांच्या काळात ७.६९ लाख रुपयांची मदत पाठवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात १.८५ लाख रुपयांचा अन्नपुरवठा दोन हप्त्यांमध्ये पाठवला. ज्यामुळे खलाशांना उपलब्ध साठा अतिशय जपून वापरावा लागला.

शाकाहारी असून मला मासे खावे लागले

खलाशांनी सांगितले की, अन्न लवकर संपल्यामुळे आम्हाला जेवणात फक्त भात, मीठ आणि कधी कधी मासे खावे लागत होते. ४० वर्षीय गोपाल दास यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले, “मी शाकाहारी असूनही मला जहाजावर मासे खावे लागले. जगण्यासाठी आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता.” फक्त अन्नच नाही तर पाण्याचीही जहाजावर कमतरता होती. एका खलाशाने सांगितले की, आम्हाला रोज जेमतेम ३०० मिली पाणी दिले जात असे. समुद्रातील उष्णतेच्या मानाने हे पाणी खूपच कमी होते.

२१ वर्षीय हिमांशू सिंह पहिल्यांदाच खलाशी म्हणून जहाजावर गेला होता. त्याने म्हटले, “पाण्याच्या कमतरतेमुळे आम्हाला समुद्राचे पाणी किंवा आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या टँकरमधील पाण्यावर अवलंबून राहावे लागत होते.” अन्न व स्वच्छ पाण्याच्या अभावामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाले. अनेकांमध्ये अशक्तपणा, निर्जलीकरण, अंगावर पुरळ येणे आणि वजन घटण्यासारख्या समस्या दिसून आल्या.

50 Indian Sailors Rescued Arabian Sea
न्यायालयाच्या निकालानंतर खलाशांनी आपल्या घराची वाट धरली. (Express photos by Akash Patil)

२३ वर्षीय अंकित कुमार म्हणाला, माझे वजन ६७ किलो होते, आम्ही जहाजावर कमी अन्न खात होतो. माझे वजन आता ५० किलोंवर आले आहे. अन्न-पाण्याशिवाय जहाजावर कोणतीही वैद्यकीय मदत उपलब्ध नव्हती.

नसीरुद्दीन मुजीबर यांनी सांगितले की, आम्हाला घरी जाऊ द्या, अशी विनंती आम्ही वारंवार करत होतो. मात्र प्रकरण न्यायालयात असल्यामुळे तुम्हाला सोडता येणार नाही, असे ठरलेले उत्तर वारंवार दिले जात होते. आणखी एका खलाशाने सांगितले की, डिझेलचा पुरवठा कमी झाल्यामुळे वीजपुरवठाही होत नव्हता. यामुळे जहाजावरील खोल्यात अंधार होता. जहाजावर करण्यासारखे काहीच नसल्यामुळे प्रचंड कंटाळा येत होता. यावर मात करण्यासाठी आणि मनोधैर्य खचू नये यासाठी आम्ही पत्त्यांसारखे खेळ खेळत होतो, असे स्टीफन दिनेशने म्हटले.

मुंबई उच्च न्यायालयाने आता खलाशांना सोडण्याचे आदेश दिल्यानंतर यलो गेट पोलिसांनी सांगितले की, ते आपला तपास सुरू ठेवणार आहेत. जहाजाच्या मालकासह नऊ जणांविरुद्ध १५ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे आता सुटका झालेल्या खलाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला मात्र काही महिन्यांनी पुन्हा एकदा समुद्रा जहाजावर जाण्याचाही मानस व्यक्त केला. समुद्रात जहाजावर काम करणे, हेच आमचे कौशल्या आहे. त्यामुळे काही दिवस विश्रांती करून आम्ही कामावर परतू, असेही काही खलाशांनी म्हटले.

Bombay High Court
५० खलाशांची सुटका करण्याचे हायकोर्टाचे आदेश

निर्जीव जहाजांपेक्षा आम्हाला सजीव माणसांची चिंता – न्यायालय

मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने म्हटले की, आम्हाला तुमच्या निर्जीव जहाजांपेक्षा त्यावरील सजीव माणसांची जास्त चिंता आहे. जहाजावरील ५० खलाशांना मुंबईत आणून न्यायालयासमोर हजर करण्यात यावे. तसेच मानवी जीवनाशी असे वागणे योग्य नाही. प्रत्येकाला आयुष्य एकदाच मिळते, अशीही टिप्पणी खंडपीठाने केली.