जागतिक मंदीवर मात करीत भारताचा विकास दर ७.६ टक्के इतका भक्कम ठेवला आहे. वाढते वार्धक्य व मंदीमुळे चीन हतबल झाला आहे. अनुकूल वातावरण, युवकांचे कौशल्य यामुळे विदेशातील मोठे उद्योग भारतात येत आहेत. या बाबी पाहता लवकरच भारत जगातील उत्पादनाची फॅक्टरी बनेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी व्यक्त केले.

शिरोली मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या स्मॅक भवन या नूतन प्रशासकीय भवनाचे उद्घाटन सोहळय़ानंतर ते उद्योजकांशी संवाद साधत होते. कार्यक्रमास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी स्मॅकचे मानचिन्ह देऊन फडणवीस यांचे स्वागत केले.

जागतिक अर्थकारणाचे विश्लेषण करून फडणवीस म्हणाले, जगभरात मोठय़ा प्रमाणावर मंदी आहे. भारताचा आíथक विकास दर उत्तमपणे पुढे सरकत आहे, त्यामुळे संपूर्ण जगभरातील मोठय़ा उद्योगांचे लक्ष आता भारताकडे आहे. अनेक मोठे उद्योग भारतात आले असून बरेच येण्याच्या तयारीत आहेत. देशातील उद्योगांनी जागतिकीकरणाच्या स्पध्रेत आपले स्थान व दर्जा सिद्ध केला आहे. आता बदलत्या संधीचा फायदा स्मॅकसारख्या संस्था, उद्योजक यांनी घेतला पाहिजे.

केंद्र सरकारच्या नव्या योजनेतून कोल्हापूरच्या विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकर विमानसेवा सुरू होईल. तर कोल्हापूर हे फौंड्री हब म्हणून ओळखले जाते. कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी आधुनिक फौंड्री हबसाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवल्यास मंजुरी देण्यात येईल, असे फडणवीस म्हणाले.

स्मॅक भवनसाठी भरीव देणगी दिल्याबद्दल ज्येष्ठ उद्योजक राम प्रताप झंवर, उद्योजक सचिन शिरगावकर यांच्यासह ज्येष्ठ उद्योजकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आभार प्रदर्शन उपाध्यक्ष राजू पाटील यांनी मानले.