संगमनेर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कन्येचा विवाह सोहळा आज, रविवारी संगमनेरमध्ये शाही थाटामाटात पार पडला. हा विवाह सोहळा संगमनेरच्या आजवरच्या इतिहासातील गर्दीचे सर्व उच्चांक मोडणारा ठरला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, मंत्री छगन भुजबळ, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह राज्यभरातून आलेले विविध मान्यवर विवाह सोहळ्यात उपस्थित होते.
संगमनेर शहरानजीक असलेल्या गुंजाळवाडी शिवारात रविवारी रात्री ८ च्या सुमारास हा विवाह सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून या विवाह समारंभाची राज्यभर मोठी चर्चा होती. अपेक्षेप्रमाणे विवाह सोहळ्यास लाखोंची गर्दी लोटली होती. विवाहस्थळाकडे येणाऱ्या सगळ्या मार्गावर दुपारपासून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राज्यभरातून आलेल्या वारकरी संप्रदायातील लोकांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. भव्य व्यासपीठासमोरील असलेले मोकळे मैदान गर्दीने खचाखच भरले होते, त्याहूनही अधिक गर्दी भोजन कक्षामध्ये होती.
विवाहसमारंभापूर्वीच सायंकाळी प्रथम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेगवेगळ्या हेलिकॉप्टरमधून संगमनेरमध्ये आगमन झाले. आमदार अमोल खताळ आणि आमदार सत्यजित तांबे यांनी नेत्यांचे हेलिपॅडवर स्वागत केल्यानंतर हा ताफा मोटारीने विवाहस्थळी पोहोचला. वधुवरांना शुभाशीर्वाद देत या आनंदाच्या क्षणी उपस्थित राहू शकल्याचे समाधान मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमास येणार, असा शब्द महाराजांना दिला होता तो पूर्ण केला, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
या दोन प्रमुख नेत्यांखेरीज विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी सोहळ्यास हजेरी लावली. खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार किरण लहामटे, विठ्ठलराव लंघे, शरद सोनवणे, माजी खासदार सुजय विखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार सत्यजित तांबे यांची जवळीक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक दाखवण्याची एकही संधी आमदार सत्यजित तांबे सोडत नाहीत किंबहुना फडणवीस यांनीही वेगवेगळ्या व्यासपीठावर त्यास मान्यता दिलेली आहे. आजही फडणवीस यांचे हेलिपॅडवर स्वागत केल्यानंतर विवाहस्थळी आमदार तांबे सातत्याने मुख्यमंत्र्यांच्या जवळ होते. व्यासपीठावर देखील दोघे इंदुरीकर महाराज यांच्या सोबत बसलेले होते. एका क्षणी आमदार अमोल खताळ आणि सत्यजित तांबे दोघेही मुख्यमंत्र्यांसमोर आल्यानंतर फडणवीस यांनी दोघांनाही आपल्या दोन बाजूला उभे करत छायाचित्रासाठी ‘पोज’ दिली, याची चांगलीच चर्चा रंगली.
