सातारा - इन्फोसिसच्या माध्यमातून साताऱ्यात आयटी केंद्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासित करून इन्फोसिसने आयटी क्षेत्राशी संबंधित केंद्र साताऱ्यात उभारण्याची मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. तसेच साताऱ्याला भेट देण्याचे आमंत्रण उदयनराजे यांनी डॉ. सुधा मूर्ती यांना दिले. प्रकल्प उभारण्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन योग्य ती मदत करण्याचे आश्वासन डॉ. मूर्ती यांनी दिले. इन्फोसिस फाउंडेशनच्या संस्थापिका राज्यसभेच्या खासदार डॉ. सुधा मूर्ती यांनी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी उदयनराजेंनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा भेट देऊन त्यांचे स्वागत केले. हेही वाचा - Petrol-Diesel Price Today: जाहीर झाले पेट्रोल-डिझेलचे नवीन दर, मुंबई-पुण्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री की दिलासा? या वेळी प्रतापगड प्राधिकरणचे सदस्य काका धुमाळ, चंद्रकांत पाटील, सोमनाथ धुमाळ, छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे सदस्य संग्राम बर्गे, ॲड. विनित पाटील, संदीप शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. संसदेतील पहिल्याच भाषणात सुधा मूर्ती यांनी महिलांच्या आरोग्य, जागतिक वारसास्थळे, विशेषत: छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, दुर्ग व देशांतर्गत पर्यटन या मुद्द्यांचा उल्लेख केला, त्याबद्दल उदयनराजे भोसले यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी डॉ. मूर्ती म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराजांनी अतिशय कमी कालावधीत रयतेचे राज्य निर्माण केले. जगाला हेवा वाटावा असे अनेक पराक्रम केले. लोकशाहीचा पाया रचला. त्यांचा इतिहास जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे. हेही वाचा - राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला, देवेंद्र फडणवीस यांचे विधान; कुणाला मिळणार उमेदवारी? मूर्ती दाम्पत्याच्या इन्फोसिस कंपनीने देशाच्या विकासामध्ये मोलाचे योगदान दिल्याचे म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे कौतुक केले. या वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात आयटी पार्क उभारण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाबरोबर सुरू असलेल्या प्रयत्नांची कल्पना दिली.