Infosys addresses Pune harassment claims with a strict zero tolerance approach : नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मधील कथित लैंगिक छळ आणि धर्मांतर प्रकरणानंतर, भारतातील आयटी क्षेत्रातील कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्याच्या इन्फोसिस बीपीएम (Infosys BPM) युनिटमध्येही छळाचे आरोप समोर आल्यानंतर इन्फोसिसने आपल्या ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा पुनरुच्चार केला आहे. बिझनेस टुडेला कंपनीने एक निवदेनच जाहीर केलं असून त्यात कर्मचाऱ्यांप्रती झिरो टॉलरन्स धोरण आखलं असल्याचं त्यांनी म्हटलंय.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर या प्रकरणाने जोर धरला असून, काही पोस्ट्समध्ये महाराष्ट्रातील नेत्यांना टॅग करून पुणे सुविधेतील कथित घटनांकडे लक्ष वेधण्यात आले. महाराष्ट्र कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी अशाच एका पोस्टला उत्तर देताना, या प्रकरणाची दखल घेतली आहे असे सांगितले.
इन्फोसिसची भूमिका: ‘झिरो टॉलरन्स’
‘बिझनेस टुडे’ला दिलेल्या निवेदनात इन्फोसिसने म्हटले आहे की, कंपनी सोशल मीडियावर होणाऱ्या आरोपांबाबत जागरूक असून अंतर्गत सुरक्षा यंत्रणांवर त्यांनी भर दिला आहे. पुण्यातील इन्फोसिस बीपीएममधील महिला कर्मचाऱ्यांचा छळ होत असल्याचा दावा करणाऱ्या काही सोशल मीडिया पोस्ट्सबद्दल इन्फोसिसला माहिती आहे. इन्फोसिस कोणत्याही प्रकारचा छळ किंवा भेदभावाच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण पाळते. आम्ही आमच्या सर्व कार्यक्षेत्रांत सुरक्षित, सर्वसमावेशक, सकारात्मक आणि आदरयुक्त कामाचे वातावरण प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.”
“कंपनीकडे लागू असलेल्या कायद्यांनुसार तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रस्थापित धोरणे आणि मजबूत यंत्रणा उपलब्ध आहेत. नोंदवलेली कोणतीही समस्या गांभीर्याने घेतली जाते आणि आमच्या प्रक्रियेनुसार स्वतंत्र समितीद्वारे त्याची चौकशी केली जाते”, असंही कंपनीने स्पष्ट केले.
अंतर्गत रिपोर्टिंग यंत्रणेबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, “याशिवाय, आमच्याकडे ‘स्पीक-अप’ संस्कृतीसह अनेक प्रतिबंधात्मक कार्यक्रम आहेत. ज्यामुळे कर्मचारी थेट त्यांची तक्रार नोंदवू शकतात.”
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये नेमका दावा काय?
इन्फोसिसच्या एका माजी कर्मचाऱ्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यात दावा केला होता की पुण्यातील इन्फोसिसमध्ये जिहादी छळ सुरू आहे. खासकरून बीपीएमच्या डायमलर प्रोजेक्टमध्ये काम करणाऱ्या अनेक मुली याला बळी पडत आहे. ही पोस्ट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री नितेश राणे यांनाही टॅग करण्यात आली होती. या पोस्टवर नितेश राणे यांनी दखल घेतल्याचा रिप्लायही दिला होता. मात्र, कालांतराने ही मूळ पोस्ट आता हटवण्यात आली आहे.
